मालवण पंचायत समितीचा सांस्कृतिक सप्ताह जाहीर !
सभापती अजिंक्य पाताडे यांची घोषणा ; २२ ते २७ नोव्हेंबर पर्यंत चालणार महोत्सव
२२ ते २४ रोजी वृद्ध लोककलाकारांसाठी पं. स. चे व्यासपीठ
२५, २६ नोव्हेंबरला बोर्डींग मैदानावर क्रीडा स्पर्धा तर २७ नोव्हेंबरला सांस्कृतिक महोत्सवाने समारोप
कुणाल मांजरेकर
मालवण : नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या मालवण पंचायत समितीच्या वतीने २२ ते २७ नोव्हेंबरला सांस्कृतिक सप्ताह साजरा केला जाणार आहे. या अंतर्गत २२ ते २४ नोव्हेंबरला वृद्ध लोककलाकारांना आपल्या कला सादरीकरणासाठी पंचायत समितीचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डींग मैदानावर क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तर २७ नोव्हेंबर रोजी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित सांस्कृतिक महोत्सवाने या सप्ताहाचा समारोप केला जाणार असल्याची माहिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी आदी उपस्थित होते. यावेळी श्री. पाताडे म्हणाले, पंचायत समितीच्या वतीने नोव्हेंबर महिन्यात हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये गावातील लोककलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. तालुक्यात अनेक वृद्ध कलाकार आहेत, ज्यांना शासनाकडून वृद्ध कलाकार म्हणून मानधन मिळवताना पुरावे जमा करण्यासाठी अनेक अडचणी येतात. अशा कलाकारांना पंचायत समितीच्या वतीने व्यासपीठ देण्यात येणार आहे. २२ ते २४ नोव्हेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे कार्यक्रम चालणार आहेत. यामध्ये प्रत्येक पंचायत समिती मतदार संघ निहाय दीड तासांचा वेळ दिला जाणार आहे. या कालावधीत त्या त्या भागातील लोककलाकारांना संधी देण्यात येणार आहे. याचे नियोजन स्थानिक जि. प. , पं. स. सदस्य, त्या विभागातील सरपंच आणि ग्रामस्तरीय कमिटीने करायचे आहे. प्रत्येक दिवशी ४ पं. स. मतदार संघाचे कार्यक्रम होणार आहेत.
२५ आणि २६ नोव्हेंबर रोजी टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डींग मैदानावर क्रीडा स्पर्धा होणार आहेत. तर २६ नोव्हेंबर रोजी पंचायत समिती मध्ये सत्यनारायणाची महापूजा होणार आहे. तसेच २७ नोव्हेंबर रोजी कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानंतर या सप्ताहाचा समारोप होणार आहे. या दिवशी पंचायत समितीच्या प्रत्येक विभागनिहाय आदर्श कर्मचारी पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी दिली.