मालवणच्या बोर्डींग मैदानावर उद्यापासून “निलेश राणे चषक” टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार ….
“डे- नाईट” स्वरूपात चालणार स्पर्धा ; बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशनचे आयोजन
उद्योजक डॉ. दीपक परब यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; २६ रोजी निलेश राणेंच्या उपस्थितीत समारोप
कुणाल मांजरेकर
मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने २३ ते २६ मार्च या कालावधीत मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डींग मैदानावर “निलेश राणे चषक” ही राष्ट्रीय स्तरावरील खुली टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होत आहे. तब्बल तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक असलेल्या या क्रिकेट स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उद्योजक डॉ. दीपक परब यांच्या हस्ते उद्या (बुधवारी) दुपारी ३ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून यावेळी भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तर २६ मार्च रोजी माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा होणार असल्याची माहिती स्पर्धा प्रमुख तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी दिली.
या स्पर्धेतील विजेत्या संघास ३ लाख रुपये तसेच आकर्षक निलेश राणे चषक तर उपविजेत्या संघास १ लाख ५० हजार व आकर्षक निलेश राणे चषक यासह वैयक्तिक स्तरावरील बक्षिसे मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट यष्टिरक्षक, अंतिम सामन्यातील सामनावीर, प्रत्येक सामना सामनावीर यांचा सन्मान होणार आहे. तसेच क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंचा तसेच जेष्ठ खेळाडूंचे सन्मान निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.