भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती ; महिलांच्या हस्ते जलपूजन व कलश पूजन


मालवण | कुणाल मांजरेकर
चिंदर गावचा पर्यटनदृष्ट्या कायापालट करण्याची क्षमता असलेल्या आणि गावच्या विकासात महत्वपूर्ण ठरणा-या ऐतिहासिक शिवकालीन तलावाच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ गावातील महिलांच्या हस्ते जलपूजन आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नुकताच करण्यात आला. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत चिंदर गावातील ऐतिहासिक शिवकालीन तलावाच्या सुशोभीकरण व पायाभूत सुविधांच्या विकास करणे या कामांसाठी पाच कोटी विकास निधी मंजूर झाला आहे.
यावेळी बोलताना प्रभाकर सावंत यांनी प्रत्येक गावाने आपल्या गावची एकी टिकवण्यासाठी राजकीय व्यासपीठ बाजूला ठेवून एकत्र येऊन विकास कामे करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यातूनच गावचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. धोंडी चिंदरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत धार्मिक पद्धतीने गावाला विश्वासात घेऊन या कामाचा शुभारंभ केला आहे. या निमित्ताने एक नवा पायंडा सुरू केला आहे त्याचा आनंद आहे असे ते म्हणाले.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, सरपंच स्वरा पालकर, उपसरपंच महेंद्र मांजरेकर, मधुकर पाताडे, प्रमुख मानकरी देवेंद्र पाताडे, बाबा मोंडकर, महेश मांजरेकर, दिपक सुर्वे, प्रकाश मेस्त्री, देवेंद्र हडकर, संतोष गावकर, अरुण घाडी, नांदोस उपसरपंच विजय निकम, दाजी सावजी, भाई तावडे, पंकज साधये, चिंदर गावचे बारापाच मानकरी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.


यावेळी बोलताना धोंडू चिंदरकर यांनी सांगितले की सातत्यपूर्ण प्रयत्नातून या तलावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध झाला आहे. यासाठी खासदार नारायण राणे, तत्कालीन पालकमंत्री रविंद्र चव्हाण, विद्यमान पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गाव विकासासाठी सर्वांनी एक होऊन काम करण्याची गरज आहे.यासाठी आपण एकदिलाने पाठीशी राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमानिमित्त धार्मिक कार्यक्रम,जलपूजनाचे आयोजन करण्यात आले होते. बहुसंख्य महिलांनी सहभागी होत कलशपूजनही केले
















Subscribe to my channel




