सिंधुदुर्गातील चारही नगरपंचायतीची नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर
१४ फेब्रुवारी रोजी होणार निवडणूक प्रक्रिया ; ८ फेब्रुवारी पासून निवडणूक कार्यक्रम सुरू
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकत्याच पार पडलेल्या चारही नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक सोमवार दि. १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. हा निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवार ८ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, दोडामार्ग, देवगड, वैभववाडी या चारही नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे यामध्ये ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे मुख्य अधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर करणे, त्यानंतर छाननी केली जाणार आहे. संध्या. ५ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांची नावे व ती फेटाळण्याची कारणे सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाणार आहेत. १० फेब्रुवारी रोजी सायं. ५ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांनी अपील दाखल करणे, त्यानंतर वैधरित्या नामनिर्देशन केलेल्या उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहे. ११ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत सायंकाळी ४ वाजेपर्यंत तर १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता विशेष सभेचे आयोजन व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे वर्णानुक्रमे घोषित केली जाणार आहेत. तसेच या ठिकाणी आवश्यक असल्यास अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान व निकाल घोषित केला जाणार आहे. याच दिवशी सकाळी १०.३० ते १२.३० वाजेपर्यंत उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची मुख्याधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर केली जाणार आहेत. असा हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.