सावंतवाडी : शहरातील शिरोडा नाका परिसरात भटक्या कुत्र्यांवर बंदुकीतून गोळ्या झाडल्याची संतापजनक घटना आज घडली. या गोळीबारात एका कुत्र्याचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुक्या प्राण्यांवर अशा प्रकारे गोळ्या झाडण्याचे धाडस नेमके कुणी केले, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
घटनेची माहिती समजताच परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, गोळीबार करणारी व्यक्ती कोण, याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. भरवस्तीत अशा प्रकारे बंदुकीचा वापर करून मुक्या प्राण्यांचा जीव घेण्याचा प्रकार घडल्याने शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, प्राणीप्रेमी तथा माजी जिल्हा परिषद सभापती मंगेश तळवणेकर यांनी या अमानुष प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. मुक्या प्राण्यांवर गोळ्या झाडणे ही अत्यंत निंदनीय बाब असून, अशा कृत्याला कोणतीही माफी असू शकत नाही. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत संबंधित व्यक्तीचा तातडीने शोध लावावा आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.