

नगरपालिकेत आयोजित बैठकीत नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या सूचना ; मुख्य नाक्यांवर वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस उपलब्ध करावेत
मालवण : मालवण शहरात पर्यटन हंगामाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या शेवटच्या मे महिन्यात पर्यटकांची मोठी वर्दळ होऊन वाहतुक कोंडी निर्माण होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशानाने खबरदारीचे उपाय करावेत, शहरातील मुख्य नाक्यांवर वाहतुक नियंत्रणासाठी पोलीस तैनात करावेत, अशा सूचना मालवणच्या नगरध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी मालवण नगरपालिकेत आयोजित बैठकीत पोलिसांना केल्या. तसेच वीज वितरण विभागाने पावसाळ्यापूर्वी शहरातील वीज दुरुस्तीची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, अशा सूचनाही नगराध्यक्षानी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
मालवण शहरात वाढत जाणारी वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज दुरुस्ती कामे याविषयी मालवण नगरपालिकेत मंगळवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, उपनराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी आचरेकर, मागासवर्गीय कल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेवक महेश कांदळगावकर, रविकिरण तोरसकर, महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर, नगरसेविका महानंदा खानोलकर, नीना मुंबरकर यांच्यासह आरटीओ विभाग, मालवण पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, वीज वितरण कंपनी व नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत यांनी मालवण एसटी स्टॅन्ड समोरील रस्त्यावर दुपारच्या वेळेत मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बस प्रवासी व सामान भरण्यासाठी उभ्या केल्या जात असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगत हा प्रश्न सुटणे महत्वाचे आहे असे सांगितले. यावर ट्रॅव्हल्स उभ्या करण्यासाठी भरड परिसरातील नगरपालिकेचे वाहनतळ, एसटी स्टॅन्ड परिसर किंवा देऊळवाडा पूला नजीकच्या मोकळ्या परिसराचा वापर करण्यात यावा अशा सूचना यावेळी मांडण्यात आल्या. देऊळवाडा येथील जागेबाबत संबंधित जागामालक यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी सांगितले.
मालवण शहरात सध्या पर्यटन हंगामाचा महत्वाचा टप्पा सुरु असून पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत असल्याने पर्यटकांच्या वाहनामुळे शहरातील भरड नाका, भरड – तारकर्ली रोड नाका, रांगोळी महाराज मठ नाका, तानाजी नाका, सकपाळ नाका, बंदर जेटी रोड, मेढा -राजकोट रस्ता आदी ठिकाणी वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होत असल्याचे यावेळी नगराध्यक्ष ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, महेंद्र म्हाडगुत, महेश कांदळगावकर व इतरांनी सांगितले. यासाठी पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेचे मार्गदर्शन घेऊन वाहतूक मार्ग सुयोग्य करणे व पोलीस तैनात ठेवणे महत्वाचे असल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी पर्यटन हंगामाच्या या महिन्याभरासाठी शहरातील मुख्य नाक्यांवर पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यासाठी मालवण पोलीस स्थानकाने पोलीस कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचना मालवण पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांना केली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मालवण मधील वीज दुरुस्ती विषयक कामांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. शहरातील अनेक पोल धोकादायक स्थितीत असून ते बदलावेत अशी मागणी महेंद्र म्हाडगुत यांनी केली. तर अनेक ठिकाणी पोल बदलल्यानंतर जुने पोल रस्त्यावरच ठेवण्यात आले असून ते तातडीने हटविले जावेत असे सहदेव बापर्डेकर यांनी सांगितले. तर पावसाळ्याला एक महिना बाकी राहिला असून अजूनही वीज दुरुस्तीची कामे सुरु असल्याने यासाठी वीज खंडित केली जात असल्याने ऐन पर्यटन हंगामात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षीपासून वीज कंपनीने मार्च महिन्यातच वीज दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, अशा सूचना यावेळी नगराध्यक्ष सौ. वराडकर यानी वीज अधिकाऱ्यांना केल्या.
नवीन वीज मीटर जोडणीसाठी वीज वितरण कंपनी सामान्य नागरिकांकडून ना हरकत दाखला मागत असताना शहरातील रस्त्याच्या कडेला केलेल्या अतिक्रमणांना वीज मीटर कसे काय दिले गेले, त्यांना ना हरकत दाखला कोणी दिला, कशाच्या आधारावर वीज मीटर दिले गेले ? असे प्रश्न यावेळी आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी वीज अधिकाऱ्यांना विचारत या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत तपस्वी मयेकर यांनी आम्ही गेले अनेक दिवस सदर अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी करत असताना कारवाई केली जात नाही अशी नाराजी व्यक्त करत प्रशासनाने कारवाई करावी असे सांगितले. यावर मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी सदर अतिक्रमणांना नोटीसा बजावल्यावर कारवाई करू असे सांगितले.



Subscribe to my channel




