तीन मुलींच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले
सावंतवाडी | प्रतिनिधी झाडावरील गांजिल माशांचे पोळे अचानक दुचाकीस्वारांच्या अंगावर कोसळले आणि संतप्त माशांनी केलेल्या हल्ल्यात एका निष्पाप जीवाचा बळी गेला. माडखोल येथील आनंद हेमा म्हालटकर (वय ५३, रा. म्हालटकरवाडी) यांचा शुक्रवारी दुपारी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत गंभीर जखमी झालेले स्वप्निल संतोष लातये (वय ३१, रा. नमसवाडी) यांच्यावर सावंतवाडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळाली आहे.
ही दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी घडली. स्वप्निल लातये आणि आनंद म्हालटकर हे दोघे दुचाकीवरून कारिवडे गवळीवाडीच्या दिशेने जात होते. याचवेळी त्यांच्या पुढे बांबूने भरलेला कॅन्टर जात होता. कॅन्टरचा वरचा भाग रस्त्यालगतच्या झाडाच्या फांदीला लागल्याने झाडावरील गांजिल माशांचे पोळे तुटून थेट मागून येणाऱ्या दुचाकीस्वारांच्या अंगावर पडले. अचानक झालेल्या माशांच्या हल्ल्यामुळे दोघांचीही एकच तारांबळ उडाली. माशांनी चावा घेतल्याने दोघेही दुचाकीवरून खाली कोसळले आणि गंभीर जखमी झाले.
घटनेचे गांभीर्य लक्षात येताच मागून येणारे कारिवडे येथील शिवसेना उपविभागप्रमुख रवी परब यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना वाचवण्यासाठी धाव घेतली. माशांचा हल्ला सुरू असतानाही मदतीचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर दोघांनाही तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच आनंद म्हालटकर यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. स्वप्निल लातये यांना पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेत मदतीसाठी धावलेले रवी परब, सुभाष परब यांच्यासह आणखी एका व्यक्तीलाही गांजिल माशांनी लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे.
तीन मुलींच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले!
आनंद म्हालटकर हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अत्यंत कष्टाने संसाराचा गाडा ओढणाऱ्या म्हालटकर यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आईपाठोपाठ वडिलांचेही छत्र हरपल्याने त्यांच्या तीन मुलींच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात आई, तीन मुली, एक भाऊ, बहिणी आणि भावजय असा परिवार आहे.
शुक्रवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एका सामान्य कष्टकरी कुटुंबाचा आधार हरपल्याने माडखोल परिसरात हळहळ व्यक्त होत असून या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे.





Subscribe to my channel




