
मालवणच्या पत्रकारिता आणि पर्यटन क्षेत्रातील योगदानाची दखल; नव्या जबाबदारीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन
मालवण : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) या राज्यातील उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्राच्या शिखर संस्थेच्या जनसंपर्क, माध्यम व संवाद समितीवर (PR, Media & Communication Committee) मालवणचे ज्येष्ठ पत्रकार तथा पर्यटन व्यावसायिक प्रफुल्ल वसंत देसाई यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी प्रफुल्ल देसाई यांना सुपूर्द केले.
MACCIA ही राज्यातील उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाची शिखर संस्था असून सन २०२७ मध्ये संस्थेच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्योग-व्यापार क्षेत्राच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या व्यापक उपक्रमांमध्ये जनसंपर्क, माध्यमे आणि प्रभावी संवादाची भूमिका लक्षात घेता प्रफुल्ल देसाई यांची समितीवर झालेली नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
प्रफुल्ल देसाई यांच्या अनुभवाचा आणि पत्रकारिता व पर्यटन क्षेत्रातील योगदानाचा समितीच्या कामकाजासाठी निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त करताना अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी त्यांच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला आणि नव्या जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, या नियुक्तीबद्दल मा. सि.वा. कोकण विभागाचे उपाध्यक्ष डॉ. संतोष राणे, कोकण विभागाचे माजी उपाध्यक्ष डॉ. दीपक परब, ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेंडणेकर, सिंधुदुर्गचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य ॲड. नकुल पार्सेकर, राजन नाईक, विजय केनवडेकर, मनोज वालावलकर, विशाल कामत, कुणाल वरस्कर आणि मिलिंद प्रभू यांनीअभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







Subscribe to my channel






