डेरवणमध्ये क्रॉसकंट्रीसह जिल्हास्तरीय टेबल टेनिसचा थरार; ८ सप्टेंबरला क्रीडा महोत्सव

चिपळूण : श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट, डेरवण यांच्या वतीने भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर स्मृती क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे यंदा १२ वे वर्ष असून, ८ सप्टेंबर २०२६ रोजी एसव्हीजेसीटी क्रीडा संकुल, डेरवण येथे क्रॉसकंट्रीसोबत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धाही रंगणार आहे.

क्रॉसकंट्री स्पर्धेत १२, १४, १६ आणि १८ वर्षांखालील मुला-मुलींसाठी स्वतंत्र गट ठेवण्यात आले आहेत. १२ वर्षांखालील मुला-मुलींसाठी २ किलोमीटर, १४ वर्षांखालील गटासाठी ३ किलोमीटर, १६ वर्षांखालील गटासाठी ४ किलोमीटर, तर १८ वर्षांखालील मुलांसाठी ६ किलोमीटर आणि मुलींसाठी ४ किलोमीटर अंतराची शर्यत होणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना एकूण ५५ हजार रुपयांची रोख पारितोषिके, पदके आणि प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युवा धावपटूंना आपले कौशल्य आणि जिद्द दाखविण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

टेबल टेनिसपटूंनाही जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी

क्रॉसकंट्रीसोबत यंदा जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. ११, १३, १५, १७ आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींसाठी विविध गटांत स्पर्धा होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या अधिकृत निवड चाचणीचा भाग म्हणून या स्पर्धा घेतल्या जाणार असून, निवड झालेले खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील टेबल टेनिसपटूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासोबतच उच्चस्तरीय स्पर्धेचा अनुभव मिळणार आहे. सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनपर टी-शर्टही देण्यात येणार आहे.

शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शिस्त, आत्मविश्वास आणि सांघिक भावना विकसित करण्यासाठी क्रीडा उपक्रमांचे महत्त्व मोठे आहे. ‘खेळ ही जीवनशैली’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेला हा क्रीडा महोत्सव जिल्ह्यातील युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २ सप्टेंबर २०२६ ही अंतिम नोंदणी तारीख आहे. अधिक माहितीसाठी ९८२२६३९३०६, ९३२५४४९२०१, ९३२५८९७८७७ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!