कुडाळ- मालवण मधील खड्ड्यांची जबाबदारी माझी ; महिन्याभरात कामाला सुरुवात !
आ. वैभव नाईक यांची ग्वाही-; खड्ड्यांवरून ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांना करण्याचा सल्ला
कुणाल मांजरेकर
कुडाळ आणि मालवण तालुक्यात अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, त्यामुळे नागरिकांना त्रास होतोय, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मात्र मतदार संघातील 42 कोटींच्या रस्ते कामाला यापूर्वीच परवानगी मिळून वर्कऑर्डर देखील काढण्यात आली आहे. परंतु, कोरोनामुळे ही कामे रखडली असून जिल्ह्यातील ठेकेदारांचे सुमारे १०० कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अडकले आहेत. हा निधी मिळवून देण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. येत्या महिन्याभरात ही रक्कम मिळवून देण्या बरोबरच मतदार संघातील रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली जाईल, अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, माझ्यावर टीका करून खड्ड्यांची दुरुस्ती होणार नाही, त्यामुळे ज्यांना यावरून राजकारण करायचं आहे, त्यांना खुशाल करूदेत, मी रस्ते सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार, असे ते म्हणाले.
येथील शिवसेना कार्यालयात शुक्रवारी सकाळी ही पत्रकार परिषद झाली. यावेळी आ. नाईक यांनी कुडाळ आणि मालवण तालुक्यात वर्कऑर्डर दिलेल्या रस्त्यांची आणि ठेकेदारांची यादी सादर केली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती मंदार केणी, पंकज सादये, गणेश कुडाळकर, तपस्वी मयेकर, उमेश मांजरेकर, सेजल परब यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, कुडाळ आणि मालवण तालुक्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे लोकांना त्रास होत आहे. कामावरून राजकीय आरोप देखील होत आहेत. मागील महिन्यात कुडाळ आणि मालवण तालुक्यातील बहुतांशी रस्ते मंजूर करून त्याची ऑर्डर देखील देण्यात आली. मात्र दुर्दैवाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही सर्व कामे रखडली आहेत. त्यामुळे हे रस्ते पूर्णपणे नादुरुस्त झाले आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. मात्र आता राज्यातील परिस्थिती हळूहळू सुधारत असून येत्या महिन्याभरात या रस्त्यांची कामे सुरू केली जातील. जिल्ह्यातील ठेकेदारांचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जवळपास शंभर कोटी रुपये अडकले असून हा निधी मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार आहे. मात्र कोणतेही कारण असले तरी या रस्त्यांची जबाबदारी माझी असून ही जबाबदारी घेऊन येत्या महिन्याभरात या रस्त्यांची कामे सुरू केली जातील असे ते म्हणाले.