
मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी व्यक्त केली नाराजी : एअरपोर्ट वर जिल्ह्यातील टॅक्सी चालकांनाच संधी देण्याची मागणी
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारचाकी वाहनांना गोवा आणि विशेषतः मोपा एअरपोर्ट वर नाहक त्रास दिला जात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी एअर पोर्टवर मात्र स्थानिक वाहन चालकांना वगळून गोवा पासिंग च्या टॅक्सी चालकांना रेड कार्पेट घातले जात असल्याचा गंभीर प्रकार मनसेचे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी निदर्शनास आणून दिला आहे. चिपी एअरपोर्ट प्रशासनाने याठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच चारचाकी वाहनाना व्यवसायाची संधी उपलब्ध करुन द्यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विरोधात आंदोलन छेडेल, असा इशारा त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
गोवा राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणतेही वाहन गेल्यावर त्यांना तेथील वाहतूक पोलिसांकडून नाहक त्रास दिला जातो. मोपा व दाभोळ एअरपोर्ट वर देखील जिल्ह्यातील वाहन चालकांना असे अनुभव अनेकदा आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रवासी मोपा एअरपोर्ट चा वापर करतात. त्यामुळे मोपा प्रशासन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहन चालकांना तेथे व्यवसाय करण्याची संधी देणार का? या प्रश्नाचे उत्तर नक्कीच नाही हेच येणार. असे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी एअरपोर्ट वर चक्क गोवा पासिंग च्या वाहनाना स्टॅन्ड उपलब्ध करुन देण्यात आले आहे. याठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकही वाहन दिसून येत नाही फक्त आणि फक्त गोवा राज्यात पासिंग असलेलीच वाहने येथे दिसून येतात. हा प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहन चालकांवर अन्याय करणारा आहे. चिपी एअरपोर्ट प्रशासनाने हे प्रकार वेळीच बंद करुन जिल्ह्यातील वाहनांना येथे व्यवसाय करण्याची संधी द्यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विरोधात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.





Subscribe to my channel






