“त्या” स्टॉलधारकांसाठी निलेश राणेंचा पुढाकार ; मेरीटाईम बोर्डाच्या मुख्य अधिकाऱ्यांची घेतली भेट

स्टॉलधारकांवर कारवाई न करण्याची मागणी : संबंधितांना कायमस्वरूपी स्टॉल देण्यासाठी प्रयत्न करणार

बंदर विकासमंत्री अस्लम शेख यांच्याशी देखील निलेश राणेंनी केली चर्चा : विजय केनवडेकर यांची माहिती

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण बंदर जेटीवर छोटे मोठे स्टॉल उभारून व्यवसाय करणाऱ्यांना बंदर विभागाने सात दिवसांत जागा मोकळी करून देण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. ही बाब संबंधित व्यावसायिकांनी भाजप नेते निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर श्री. राणे यांनी त्याची त्वरित दखल घेतली आहे. मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांची मुंबईत भेट घेऊन या व्यावसायिकांना विस्थापित करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. या स्टॉलधारकांना जेट्टीवर कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मेरीटाईम बोर्ड आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खात्यामार्फत संयुक्त आराखडा निलेश राणे सादर करणार आहेत. दरम्यान, या प्रश्नाबाबत बंदर विकासमंत्री अस्लम शेख यांच्याशी देखील निलेश राणेंनी चर्चा केली आहे.

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने मालवण बंदर जेटी वरील स्टॉलधारकांना सात दिवसात स्टॉल खाली करण्याच्या व जागा मोकळी करून देण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. याबाबत माजी नगरसेविका सौ. पुजा सरकारे, दामोदर तोडणकर, संजय नार्वेकर व अन्य स्टॉलधारक यांनी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्याशी दूरध्वनी वरुन संपर्क करीत याबाबत माहिती दिली. या व्यवसायिकांचा विचार करून निलेश राणे यांनी मुंबई येथे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांची भेट घेऊन संबंधित स्टॉलधारकांवरती कारवाई करू नये अशी विनंती केली. सर्व स्टॉलधारकांना कायमस्वरूपी स्टॉल कसे उपलब्ध करून देता येतील यासंबंधी यावेळी चर्चा केली. त्याचबरोबर बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांच्याशी चर्चा करून कोरोनाच्या महामारी मध्ये स्टॉलधारकांचे झालेले आर्थिक नुकसान पाहता या छोट्या व्यापाऱ्यांवर कारवाई करू नये अशी विनंती केली आहे.

या स्टॉलधारकांना कायमस्वरूपी स्टॉल देण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या लघु, सूक्ष्म व मध्यम खात्यामार्फत व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने कसे कायमस्वरूपी स्टॉल उपलब्ध करून देता येतील यासंबंधी विशेष आराखडा निलेश राणे यांच्यामार्फत मेरीटाईम बोर्डाकडे सादर करणार असल्याची माहिती भाजपचे प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!