भाजपचा नामुष्कीजनक पराभव ; अवघ्या ५ जागांवर विजय, नगराध्यक्ष उमेदवार शिल्पा खोत तिसऱ्या क्रमांकावर


ठाकरे शिवसेनेकडे ५ जागा ; अपक्ष उमेदवार सुदेश आचरेकर यांचाही विजयी षटकार
मालवण | कुणाल मांजरेकर
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या मालवण नगरपरिषद निवडणुकीत आमदार निलेश राणे यांचा करिष्मा दिसून आला आहे. वर्षभरापूर्वी कुडाळ मालवण मतदार संघातून निवडून येत अल्पावधीतच शेकडो कोटींचा निधी मालवणात खेचून आणणाऱ्या निलेश राणे यांच्या नेतृत्वाला मालवणकरांनी पसंती दिली आहे. शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. ममता मोहन वराडकर (४२०१ मते) यांनी आपल्या प्रतिस्पर्धी ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार सौ. पूजा प्रमोद करलकर (३१७९ मते) यांचा १०२२ मतांनी पराभव केला.

भाजपच्या उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत ३१५४ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. या निवडणुकीत शिवसेनेने २० पैकी १० जागा मिळवत पालिकेवर निर्विवाद बहुमत मिळवले आहे. तर भाजपला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले. ठाकरे शिवसेनेने ४ जागांवर विजय मिळवत शहरात आपले अस्तित्व टिकवले आहे. तर भाजपने नगरसेवक पदाची उमेदवारी नाकारलेल्या माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी प्रभाग ७ अ मधून अपक्ष म्हणून निवडून येत मालवण शहराच्या राजकारणात आपणच किंगमेकर असल्याचा संदेश दिला आहे.


मालवण नगरपालिकेवर मंदार केणी, दीपक पाटकर, महेंद्र म्हाडगुत, शर्वरी पाटकर, दर्शना कासवकर, निना मुंबरकर, महानंदा खानोलकर हे अनुभवी चेहरे आणि त्यांच्यासोबत सहदेव बापर्डेकर, पूनम चव्हाण, अन्वेषा आचरेकर, मंदार ओरसकर, तेजस्वी मयेकर, भाग्यश्री मयेकर, ललीत चव्हाण यांच्यासह काही नवे चेहरे निवडून आले आहेत.

मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीची चर्चा राज्यभर झाल्याने या लढतीकडे हायहॉल्टेज म्हणून पाहिले जात होते. राज्यातील महायुती मधील भाजप व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना येथे आमने सामने असल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण विरुद्ध शिवसेना आमदार निलेश राणे यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली होती. मात्र येथील मतदारांनी आमदार निलेश राणे यांचे व्हिजनरी नेतृत्व, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक प्रश्नांवरची निलेश राणे यांची पकड निर्णायक ठरवत नगराध्यक्ष पदासह तब्बल १० जागा शिवसेनेकडे देत आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण शहराच्या विकासाची दारे खुली केली आहेत.

विजयी उमेदवार
प्रभाग १ – मंदार केणी – भाजप, दर्शना कासवकर – भाजप, प्रभाग २ – ललित चव्हाण – भाजप, अनिता गिरकर – उबाठा शिवसेना, प्रभाग ३ – दीपक पाटकर – शिवसेना, नीना मुंबरकर – शिवसेना, प्रभाग ४ – सिद्धार्थ जाधव – शिवसेना, पूनम चव्हाण – शिवसेना, प्रभाग ५ – महेंद्र म्हाडगुत – उबाठा शिवसेना, महानंदा खानोलकर – भाजप, प्रभाग ६ – सहदेव बापर्डेकर – शिवसेना, अश्विनी कांदळकर – शिवसेना, प्रभाग ७ – सुदेश आचरेकर – अपक्ष, मेघा गावकर – शिवसेना, मंदार ओरसकर – उबाठा शिवसेना, शर्वरी पाटकर – शिवसेना, प्रभाग ९ – अन्वेषा आचरेकर – भाजप, महेश कोयंडे – शिवसेना, प्रभाग १० – तपस्वी मयेकर – उबाठा शिवसेना, भाग्यश्री मयेकर – शिवसेना

या निकालातून मालवणच्या मतदारांनी आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाला स्पष्ट कौल दिला आहे. केवळ भावनिक राजकारण नव्हे, तर प्रभावी नेतृत्व आणि विकासाभिमुख धोरणांनाच पसंती दिली जात असल्याचा हा संदेश आहे. मालवणचा निकाल शिवसेनेसाठी आत्मविश्वास वाढवणारा असून, केवळ ५ जागांवर विजय मिळवलेल्या भाजपसाठी आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करणारा ठरला आहे. माजी आमदार वैभव नाईक यांच्या एकहाती नेतृत्वाखाली ठाकरे शिवसेनेने भाजपच्या तुलनेने नगरसेवक पदाच्या ४ जागा मिळवल्या असून ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्ष उमेदवार पूजा करलकर यांनीही दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवत शहरातील ठाकरे शिवसेनेचे अस्तित्व दाखवून दिले आहे.


Subscribe to my channel




