सिंधुदुर्गच्या शासकीय मेडीकल कॉलेजला मान्यता
सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सिंधुदुर्गच्या शासकीय मेडीकल कॉलेजला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांच्याकडून ही मंजुरी देण्यात आली असून यामुळे गेले काही वर्ष सिंधुदुर्ग जिल्हावासियांचं स्वप्न अखेर साकार झालं आहे.
या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या शंभर विद्यार्थ्याच्या बॅचला शिक्षण घेता येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांचा याकरिता चा सातत्यपूर्ण पाठपुरावा या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वपूर्ण ठरला आहे. मध्यंतरी केंद्रीय समितीने ज्यावेळी या वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली होती, त्यावेळी या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये काही त्रुटी काढण्यात आल्या होत्या. मात्र त्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर केलेल्या तपासणीत हे महाविद्यालय मंजुरीस पात्र ठरले आहे. या मंजुरीचे तसे अधिकृत आदेशही काढण्यात आले आहेत.