काही उमेदवारांच्या मनातील सर्व गैरसमज दूर करण्यासाठी परीक्षा केंद्रांची सविस्तर माहिती केली जाहीर ; जिल्हा बँकेच्या भरतीतील पारदर्शकपणा समोर



मालवण : शेतकऱ्यांची हक्काची बँक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने लिपिक पदाच्या भरती प्रक्रियेच्या निमित्ताने बँक कामकाजातील पारदर्शकपणा दाखवून दिला आहे. तांत्रिक कारणास्तव बँक भरतीसाठी सर्व उमेदवारांची परीक्षा केंद्रे जिल्ह्यातच उपलब्ध होऊ न शकल्याने काही उमेदवारांमध्ये गैरसमज निर्माण होण्याच्या शक्यतेने जिल्हा बँक प्रशासनाने बँक भरतीच्या सर्व परीक्षा केंद्रांची सविस्तर माहिती प्रसिद्ध केली आहे. उमेदवारांना योग्य पारदर्शक व तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित पद्धतीने परीक्षा देता यावी हा बँकेचा प्रमुख उद्देश असून सर्व उमेदवारांनी गैरसमज दूर करून नियोजित केंद्रावर वेळीच उपस्थित रहावे व बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत जिल्हा बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग या आस्थापनेवरील व अधिपत्याखालील असलेल्या लिपिक या श्रेणीतील ७३ रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरावयाचे आहेत त्यासाठीची परीक्षा 28/02/2026 रोजी आयबीपीएस ( इन्स्टिट्यूट बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या संस्थेमार्फत राबविली जात आहे. आयबीपीएस संस्थेचे काम हे आर.बी.आय.च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार चालत असल्याने बँकांसाठीचे भरती प्रक्रियेत पारदर्शकता निष्पक्षता व तांत्रिक शुद्धता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने देशातील मान्यताप्राप्त व विश्वासार्ह संस्था आहे व याबाबत मे. न्यायालयाने देखील निरीक्षणे नोंदवली आहेत. म्हणून बँकेने भरती प्रक्रियेसाठी आयबीपीएसची निवड केली. जिल्हा बँकेने आयबीपीएस मार्फत भरती प्रक्रिया जाहीर करताना सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पणजी, मडगाव व म्हापसा अशी पाच ठिकाणी जाहीर केली होती. परंतु लिपिक पदाच्या या भरतीसाठी जिल्हाभरातून 5077 अर्ज प्राप्त झाल्यानंतर बँकेने सुचविलेल्या केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करता येईल का? याबाबत आयबीपीएसने पडताळणी केली असता त्या केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करणे शक्य नसल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यामुळे परीक्षा केंद्रांची व्यवस्था मुंबई, पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर या ठिकाणी घेण्याचे आयबीपीएसने निश्चित केले. याबाबत काही उमेदवारांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याचे दिसून आले आहे तसेच वर्तमानपत्रात देखील याबाबत बातम्या प्रसिद्ध करून गैरसमज पसरविला जात आहे. त्यामुळे बँकेमार्फत याबाबत खुलासा करण्यात येतो की सदर परीक्षा ही इन्स्टिट्यूट बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस )या अधिकृत संस्थेमार्फत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे.
परीक्षा मूळ जाहीर झालेल्या केंद्रांवर घेतली जावी यासाठी बँकेने आयबीपीएस कडे सातत्याने पाठपुरावा केला होता. परंतु बँकेने सुचविलेल्या केंद्रांची मर्यादा व तांत्रिक सुविधा लक्षात घेऊन अंतिम केंद्र निश्चिती आयबीपीएस मार्फत करण्यात आलेली आहे. ही परीक्षा घेत असताना परीक्षा घेणाऱ्या संस्थेला सुरक्षित आणि एन्क्रिप्टेड सॉफ्टवेअर, सर्वर लोड मॅनेजमेंट, प्रत्येक उमेदवारासाठी स्वतंत्र संगणक, किमान चार जीबी रॅम व प्रोसेसर स्पीड, 15 इंची मॉनिटर, यूपीएस व पॉवर बॅकअप, हायस्पीड व स्टेबल इंटरनेट कनेक्शन, बॅकअप इंटरनेट लाईन, व्यवस्थित लँड सेटअप, प्रश्नपत्रिका ट्रान्सफर, अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी फायरवॉल व सिक्युरिटी प्रोटोकॉल, थम इम्प्रेशन व बायोमेट्रिक कॅप्चर, ऑन साईट आयटी सपोर्ट टीम, तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी संगणक व्यवस्था जनरेटर सुविधा असणे आवश्यक आहे.
याबरोबरच प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे काठीन्य समान राखण्यासाठी सदरची परीक्षा एका सत्रात घेणे आवश्यक असते. बँकेकडे प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या मोठी असल्याने बँकेने मागणी केलेल्या केंद्रांवर जिल्ह्यात सर्व उमेदवारांची एकाच वेळी परीक्षा घेणे तांत्रिक व पायाभूत सुविधांच्या मर्यादेमुळे आयबीपीएसला शक्य झालेले नाही.
त्यामुळे आयबीपीएसने खालील परीक्षा केंद्रांची निवड केली आहेसिंधुदुर्ग – मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सुकळवाड (50 परीक्षार्थी), रत्नागिरी – पी एस पी एस एस राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, देवरुख (९० परीक्षार्थी), पणजी – आयन डिजिटल झोन आय डी झेड पाठोप्लाझा पणजी गोवा (150 परीक्षार्थी ), म्हापसा – फर्स्ट इन्फोटेक ऑफिस म्हापसा गोवा (130 परीक्षार्थी), कोल्हापूर – आय एन डिजिटल झोन आयडी झेड कसबा बावडा कोल्हापूर (470 परीक्षार्थी), छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च कोल्हापूर (160 परीक्षार्थी),/सांगली – वसंत दादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सांगली (250 परीक्षार्थी), नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट सांगली (100 परीक्षार्थी), सातारा – कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, सातारा (140 परीक्षार्थी), सातारा आयटी पार्क ऑनलाईन परीक्षा केंद्र सातारा (80 परीक्षार्थी), महिला महाविद्यालय कराड (95 परीक्षार्थी), मुंबई -आय डी झेड पवई मुंबई (758 परीक्षार्थी ), पुणे – आयन डिजिटल झोन आयडीझेड हडपसर गेट नंबर 3 (700 परीक्षार्थी), आयन डिजिटल झोन गेट नंबर वन (700 परीक्षार्थी), आयएन डिजिटल झोन गेट नंबर टू (700 परीक्षार्थी), इंडियन इन्स्टिट्यूट फॉर एरोनॉटिकल इंजीनियरिंग अँड आयटी पुणे (240 प्रशिक्षार्थी), डीजी एंटरप्राइजेस कळंबे न्यू कॉम्प्लेक्स पुणे (60 परीक्षार्थी), जेपी ऑनलाईन परीक्षा केंद्र पुणे (200 परीक्षार्थी)

Subscribe to my channel




