सा. बां. चे दुर्लक्ष, पण ग्रामस्थांची तत्परता ; “त्या” खड्डेमय रस्त्यावर श्रमदान !

‘त्या’ खड्डेमय रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी ग्रामस्थांचे श्रमदान

किमान खड्डे बुजवण्याचे काम तरी तातडीने करा, अन्यथा कोणत्याही क्षणी आंदोलन : ग्रामस्थांचा इशारा

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कुंभारमाठ जरीमरी उतारावरील रस्ता पूर्णपणे उखडून गेल्याने मार्ग धोकादायक बनला होता. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनीच श्रमदान करत येथील रस्त्यावर उखडून पसरलेली खडी बाजूला करत रस्ता मोकळा केला आहे. भर पावसात ग्रामस्थांनी केलेल्या या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत ग्रामस्थ व वाहनचालक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता किमान खड्डे बुजवण्याचे काम तरी बांधकाम विभागाने तातडीने करावे, अन्यथा कोणत्याही क्षणी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महापुरुष फोवकांडा पिंपळ रिक्षा चालक मालक मित्रमंडळ व कुंभारमाठ ग्रामस्थ यांनी बांधकाम विभागास दिला आहे.

मालवण – कसाल राज्य महामार्गावर जरीमरी मंदिरा नजीकच्या उतारावर उखडलेल्या व खड्डेमय बनलेल्या रस्त्यामुळे अपघात घडत आहेत. येथून रिक्षा, दुचाकी वाहने चालवणे धोकादायक बनले आहे. उताराचा व वळणाचा रस्ता असल्याने मोठ्या अपघाताची भीती वाढली आहे. तरी रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करावी, अश्या मागणीची निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण कार्यालय येथील अधिकाऱ्यांना मंगळवारी देण्यात आले. यावेळी महेश मयेकर, सुधीर धुरी, संदेश मयेकर, मोहन वराडकर, श्रीपाद हळदणकर, प्रसाद परुळेकर, भाऊ सामंत, मनोज वाटेगावकर, मयु पाटकर, अवधुत परुळेकर, प्रमोद भोगावकर, तृप्ती लंगोटे, गणेश नलावडे आदी उपस्थित होते.

दरम्यान, रस्त्यावरील खडी बाजूला करणे, खड्डे बुजवणे याबाबत तात्काळ कार्यवाही बाबत कोणताही सकारात्मक प्रतिसाद बांधकाम विभागाकडून न मिळाल्याने ग्रामस्थांनीच श्रमदान करत रस्त्यावर उखडून पसरलेली खडी बाजूला करत रस्ता मोकळा केला. यावेळी श्रीपाद हळदणकर, महेश मयेकर, प्रसाद परुळेकर, अवधूत परुळेकर, मोहन वराडकर सहभागी झाले होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3605

Leave a Reply

error: Content is protected !!