विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; आरोग्य तपासणी व दिनदर्शिकेचे प्रकाशनही होणार
मालवण : सहकार महर्षी प्रा. कै. डी. बी. ढोलम यांच्या १३ व्या पुण्यतिथीनिमित्त कै. डी. बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्रामविकास मंडळ कावळेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी वराड कावळेवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एस. एस. पी. एम. लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांच्या माध्यमातून सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या वेळेत हे शिबिर पार पडणार आहे.
कावळेवाडी, वराड-कट्टा येथील सहकार महर्षी कै. प्रा. डी. बी. ढोलम स्मृतीस्थळ येथे हा कार्यक्रम होणार आहे. या उपक्रमांतर्गत केंद्रशाळा कट्टा क्रमांक १ येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वह्यांचे वाटप करण्यात येणार असून विद्यार्थ्यांची आरोग्यविषयक तपासणीही केली जाणार आहे. तसेच २०२७ सालच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा यावेळी आयोजित करण्यात आला आहे.
आरोग्य शिबिरामध्ये हृदयरोग, युरोलॉजी, जनरल सर्जरी, कर्करोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग, अस्थिरोग, नेफ्रोलॉजी, दंतरोग आदी विविध आजारांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच छातीचा एक्स-रे, प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग तपासणीची सुविधाही उपलब्ध असेल. याशिवाय पोटाचे विकार, मूळव्याध व संबंधित आजार, मधुमेही पाय, न भरणाऱ्या जखमा आणि इतर आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व उपचार केले जाणार आहेत. नागरिकांसाठी मोफत रक्त तपासणी, ईसीजी आणि औषधांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्यसेवा अशा विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून कै. डी. बी. ढोलम साहेब यांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात येत आहे. तरी परिसरातील नागरिक, पालक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी श्री. परमानंद वेगुर्लेकर – ७८७५२४११८२, श्री. अमित (छोटू) ढोलम – ९४०३०७३१७१, श्री. नितीन शेटये – ९४०४४९८१८२, श्री. विकास लुडबे – ९४२०२०६९६४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कै. डी. बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्रामविकास मंडळ कावळेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.





Subscribe to my channel




