महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या १६ हजार ७१७ पदांच्या भरतीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची संधी; २१ नोव्हेंबरला कुडाळमध्ये विशेष कार्यशाळा
कुडाळ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ अंतर्गत विविध संवर्गांतील तब्बल १६ हजार ७१७ पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेत दाखल होण्याची मोठी संधी युवकांना उपलब्ध झाली आहे.
या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी कुडाळ मालवण मतदार संघांचे आमदार निलेश राणे यांच्या पुढाकारातून विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ येथील मराठा समाज हॉल (कुडाळ हायस्कूलजवळ) येथे आयोजित करण्यात आली आहे.
MPSC मार्फत जाहीर करण्यात आलेल्या १६ हजार ७१७ पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ नोव्हेंबर २०२६ आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.ग्रामीण भागातील तसेच जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांना योग्य दिशा मिळावी, परीक्षेचे स्वरूप समजावे आणि तयारीसाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे, हा या कार्यशाळेमागील मुख्य उद्देश आहे.
या कार्यशाळेला जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहावे, तसेच आपल्या परिसरातील MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सिंधुदुर्गातील तरुणांसाठी ही कार्यशाळा महत्त्वाची संधी ठरणार आहे.





Subscribe to my channel




