आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंदर-मत्स्यव्यवसायाला नवी दिशा

मंत्री नितेश राणे दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यावर; बंदर विकास, जहाजबांधणी आणि मत्स्यव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाचा घेणार आढावा

सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील बंदर विकास आणि मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत नवी दिशा देण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आजपासून आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आंध्र प्रदेशातील बंदर विकास, जहाजबांधणी आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान व आधुनिक कार्यपद्धतींची ते प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.

मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील आधुनिक पद्धती, मच्छीमारांसाठी उपलब्ध होत असलेल्या नव्या संधी, त्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा या दौऱ्यात अभ्यास केला जाणार आहे. यासंदर्भात संबंधित घटकांशी चर्चा करून महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार असल्याचे मंत्री राणे यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे स्पष्ट केले.

आंध्र प्रदेशात राबविण्यात आलेले यशस्वी प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संकल्पना महाराष्ट्रातील बंदर व मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रभावीपणे कशा राबविता येतील, यावर या अभ्यास दौऱ्यात विशेष भर राहणार आहे. महाराष्ट्रातील मच्छीमारांना आधुनिक सुविधा, नव्या संधी आणि आर्थिक बळ देण्यासोबतच बंदर विकासाला गती देण्यासाठी आंध्र प्रदेशातील प्रयोगांचा उपयोग करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

error: Content is protected !!