
आ. निलेश राणेंकडून गौरव, अणावात ‘प्रोजेक्ट संजीवनी’चा शुभारंभ ; ग्रामीण भागातील आरोग्यसेवेला नवी दिशा
कुडाळ : कोकणभूमीचे सुपुत्र, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे देशासाठी अमूल्य संपत्ती असून, देशाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य आणि दिलेले योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आपल्या कोकणचे आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी काढले.
‘एक थेंब… एक आशा’ या संकल्पनेतून ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच आरोग्य व रक्त तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ या सेवाभावी उपक्रमाचा शुभारंभ आज अणाव येथे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, मानव साधन विकास संस्था अध्यक्षा सौ. उमा प्रभू, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, आरोग्य सभापती श्री. प्रितेश राऊळ यांच्यासह डॉक्टर, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी अनेकदा शहरांकडे धाव घ्यावी लागते. ही गरज ओळखून आरोग्य तपासणीची सुविधा थेट गावपातळीवर उपलब्ध करून देणारा ‘प्रोजेक्ट संजीवनी’ हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे, असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
या सेवाभावी उपक्रमामुळे ग्रामीण नागरिकांना वेळेत आरोग्य तपासणी आणि आवश्यक मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार असून, समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल. ‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या माध्यमातून सुरू झालेल्या या आरोग्यसेवेला आमदार निलेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या.






Subscribe to my channel






