खा. राणेसाहेबांचा मान राखण्यासाठीच शिवसेना सिंधुदुर्गात स्वबळावर : आ. निलेश राणे

आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही ; नगरपालिकांनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही सर्वत्र शिवसेनेचा धनुष्यबाणच दिसला पाहिजे

बंदर जेटीवर स्टॉल लावण्यासाठी ६० हजार रूपये घेऊन भाजप शहर अध्यक्षांनी लुबाडले : दत्ता सामंत यांचा आरोप

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात युतीमध्ये लढाई व्हायला नको होती, आम्ही लढाई मागितली नव्हती, खासदार नारायण राणे यांच्या शब्दाखातर आम्ही शुन्य जागा घ्यायला तयार होतो. पण राणे साहेबांचा शब्द भाजपने युती तोडून पाडला आणि तो शब्द पाळण्यासाठी आणि त्यांचा मान राखण्यासाठीच आम्ही सिंधुदुर्गात स्वबळावर लढाईसाठी तयार झालो आहोत. आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही. शिवसेनेचा धनुष्यबाण जिल्हयात सर्वत्र दिसून येईल. नगरापालिका आणि यापुढे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये फक्त शिवसेनेचाच धनुष्यबाण जिंकला पाहिजे आणि यासाठी सर्व ताकद आम्ही लावणार आहोत, असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.

आडवली मालडी विभागातील उबाठा गटातील कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात आ. निलेश राणे बोलत होते. यावेळी ते म्हणाले, कुडाळ, मालवण मतदार संघाचा सर्वांगिण विकास करण्याचे ठरवून आम्ही काम करत आहोत. कोण आमच्यावर टिका करतो कोण काय बोलतो याकडे आम्ही लक्ष देत नाही. कोण शुन्य म्हणतो कोण काय म्हणतो, याकडे मी निवडणूक निकालानंतर बोलणार आहे. मालवण शहरात नगराध्यक्ष आणि नगरसेवक असे २१ उमेदवार विजयी करून खासदार नारायण राणे यांना भेट देण्यासाठी आम्ही निवडणूक रिंगणात आहोत. आम्ही कोणावरही टिका करणार नाही, आम्ही विकास कामांवर मते मागणार आहोत, असेही श्री. राणे म्हणाले.

बंदर जेटीवरील स्टॉलमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडून २५ लाख रूपयांचा भ्रष्टाचार

मालवण बंदरजेटी येथे सर्वसामान्य मालवणातील गरीब लोकांसाठी स्टॉल लावण्यासाठी ६० हजार रूपये भाजपचे शहर अध्यक्ष यांनी घेऊन लुबाडले आहे, असा आरोप करत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत पुढे म्हणाले की, फसविणारी भाजपची ही मंडळी आम्हाला चार जागा देण्याचे सांगत आहेत. आम्हाला खासदार नारायण राणे यांनी एकही जागा दिली नसती तरीही चालले असते, त्यांना तो अधिकार आहे. मात्र ज्यांनी लोकांना फसविले ते आम्हाला सांगत असल्याने आम्ही गप्प बसणार नाही. अशा भाजपच्या स्थानिक पुढाऱ्यांना जागा दाखवून देण्यासाठी आम्ही शिवसेनेचा भगवा नगरपालिकेवर फडकविणार आहोत. बंदरजेटीवरील लाभार्थ्यांना मी स्वतः २० हजार रूपयांत स्टॉल उपलब्ध करून देऊ शकतो. भाजपच्या मंडळींनी तब्बल २५ लाख रूपयांचा भ्रष्टाचार या स्टॉलमध्ये केला आहे, आणि तीच मंडळी जनतेत मते मागत आहे. यामुळे भाजपचा भ्रमाचा भोपळा या निवडणुकीत फुटणार आहे. भाजपच्या स्थानिकांनी सेवा करण्यासाठी सत्ता नको तर जनतेला फसविण्यासाठी हवी आहे. पोट भरण्याचे काम ही भाजपची मंडळी करत आहे, असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यावेळी म्हणाले.

error: Content is protected !!