चिपळूण-संगमेश्वरमध्ये भाजपचा संघटन विस्ताराचा निर्धार; गावपातळीवर पक्ष मजबूत करण्यावर भर

‘गाव तिथे उद्योजक’ संकल्पना राबवा; ‘मन की बात’चा संदेश जनतेपर्यंत पोहोचवा – आमदार प्रमोद जठार

चिपळूण : भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील २६५-चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाची चिंतन बैठक उत्साहात संपन्न झाली. आगामी काळात गावागावात संघटन अधिक मजबूत करून जनसंपर्क वाढविण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. आमदार प्रमोद जठार आणि रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

चिंतन बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार प्रमोद जठार यांनी ‘गाव तिथे उद्योजक’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. गावातील युवकांना उद्योग व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सकारात्मक प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातील संदेश गावागावातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन जठार यांनी केले. भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने गावपातळीवर सक्रिय राहून नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवावा, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आगामी काळातील संघटनात्मक उपक्रम, गावपातळीवरील जनसंपर्क, पक्षाच्या विविध कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग वाढविण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. बूथपासून गावपातळीपर्यंत संघटन अधिक सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यावर विशेष भर देण्यात आला.

यावेळी रत्नागिरी दक्षिण जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, स्वानंद रानडे, सुप्रिया उतेकर, जिल्हा परिषद गटनेते प्रमोद अधटराव, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत शाह, कोकण भाजप ओबीसी मोर्चाचे संपर्क प्रमुख संतोष नलावडे, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, चिपळूण-संगमेश्वर मंडल अध्यक्ष, लोकप्रतिनिधी तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!