
‘महा-मायक्रो कॉन २०२६’मध्ये देशभरातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० प्रतिनिधींसह १५ वैद्यकीय महाविद्यालयांतील पीजी विद्यार्थी सहभागी होणार
रत्नागिरी : इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट आणि भ. क. ल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण विभागातील पहिली राज्यस्तरीय मायक्रोबायोलॉजी परिषद ‘महा-मायक्रो कॉन २०२६’ दि. ५ व ६ सप्टेंबर २०२६ रोजी डेरवण येथे आयोजित करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील संसर्गजन्य आजारांच्या निदान व उपचारातील अत्याधुनिक ज्ञानाची देवाणघेवाण घडवून आणणारी ही परिषद कोकणच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या परिषदेला देशभरातील नामवंत मायक्रोबायोलॉजी तज्ज्ञ, प्राध्यापक तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संसर्गजन्य आजारांचे निदान, कोविड-१९, एचआयव्ही, मलेरिया, अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स आणि फंगल इन्फेक्शन्स यांसह सध्याच्या वैद्यकीय क्षेत्रासमोरील महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
परिषदेत क्षयरोग व मलेरिया नियंत्रण, ‘वन हेल्थ’ संकल्पना, उदयोन्मुख बुरशीजन्य संसर्ग, रेबीज, व्हायरल हिपॅटायटीस, कोविड-१९ चे नवीन व्हेरियंट्स, अँटीमायक्रोबियल स्ट्यूवर्डशिप आणि एचआयव्ही निदान अशा विविध विषयांवर व्याख्याने व तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
या राज्यस्तरीय परिषदेला सुमारे २५० प्रतिनिधी, १५ वैद्यकीय महाविद्यालयांतील सुमारे ९० पीजी विद्यार्थी, नर्सिंग स्टाफ तसेच वैद्यकीय अधिकारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे सहभागी डॉक्टर, विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मायक्रोबायोलॉजी क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान आणि बदलत्या वैद्यकीय तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे.
ही परिषद मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. योगेंद्र शेळके, डॉ. वनिता कुलकर्णी, डॉ. मीना रामतीर्थकर, वैद्यकीय संचालिका डॉ. सुवर्णा पाटील आणि कॉलेज समन्वयक डॉ. नेताजी पाटील यांच्या अथक प्रयत्नांतून साकार होत आहे.
परिषदेला रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) डॉ. भास्कर जगताप तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांचीही उपस्थिती लाभणार आहे.‘महा-मायक्रो कॉन २०२६’ ही परिषद भ. क. ल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा वैद्यकीय आणि शैक्षणिक टप्पा ठरणार असून, या माध्यमातून कोकणातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना राष्ट्रीय पातळीवरील ज्ञान व अनुभवांची देवाणघेवाण करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.







Subscribe to my channel






