मोदींच्या वाढदिवसानिमित्त मालवणात भाजपचा ‘एक दीप सेवा संकल्पाच्या नावे’ उपक्रम
मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मालवण येथे ‘आशीर्वादाचा दिवा – एक दीप सेवा संकल्पाच्या नावे’ हा उपक्रम उत्साहात पार पडला.
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, राजकोट येथे गुरुवारी सायंकाळी दीपप्रज्वलन करून सेवा, सुशासन, गरीब कल्याण आणि राष्ट्रनिर्माणाचा संकल्प करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून ‘विकसित भारत’ घडविण्याचा संकल्प अधिक दृढ करण्यात आला.
‘सेवेची २५ वर्षे, सुशासन, गरीब कल्याण आणि राष्ट्रनिर्माण’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. दीपप्रज्वलनानंतर समाजसेवा आणि जनकल्याणाच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी मालवण शहर प्रभारी पंकज सादये, महिला मोर्चा अध्यक्ष अन्वेषा आचरेकर, नगरसेवक मंदार केणी, नगरसेवक विकी तोरसकर आणि युवा मोर्चा अध्यक्ष ललित चव्हाण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपप्रज्वलनाच्या माध्यमातून सेवा आणि राष्ट्रनिर्माणाचा संदेश देत मालवणातील भाजप कार्यकर्त्यांनी सेवा संकल्पाला नव्याने बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला.