घनकचरा व्यवस्थापनावर ३ कोटी १० लाख खर्च ; तरीही अभियानात मालवण न. प. पिछाडीवर !

वेंगुर्ला १७ व्या, सावंतवाडी ३२ व्या, कणकवली ६७ व्या तर मालवण पालिका १३४ व्या क्रमांकावर

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा हल्लाबोल ; पालिका शिवसेनेच्या ताब्यात गेल्यानंतर शहराचा बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप

कुणाल मांजरेकर

मालवण : २०११ ते २०१५ या कालावधीत तीन वेळा राज्य स्तरावर तर दोन वेळा विभागीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या मालवण नगरपरिषदेचा नावलौकिक शिवसेनेने धुळीत मिळवला आहे. २०१६ मध्ये ही पालिका शिवसेनेच्या ताब्यात गेल्यानंतर पालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनावर तब्बल ३ कोटी १० लाख ७४ हजार ४८८ रुपयांचा विक्रमी खर्च करण्यात आला. मात्र तरीही घनकचरा अभियान स्पर्धेत मालवण नगरपरिषद कमालीची पिछाडीवर गेली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात या चार राज्यांच्या विभागात मालवण नगरपरिषद तब्बल १३४ व्या क्रमांकावर फेकली गेली आहे. या अभियानात वेंगुर्ला नगरपरिषद १७ व्या, सावंतवाडी नगरपरिषद ३२ व्या, कणकवली नगरपंचायत ६७ व्या स्थानावर राहिली. राज्यस्तर अभियानातही मालवण नगरपरिषदेने ७२ वा क्रमांक मिळवून शेवटून पहिला क्रमांक मिळवला आहे. या अभियानात वेंगुर्ला १६ व्या, सावंतवाडी २८ व्या तर कणकवली नगरपंचायत ४८ व्या स्थानावर आहे. शिवसेनेने संपूर्ण शहर बकाल बनवले असून याचा प्रत्यय या अभियानातून आल्याची टीका माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

येथील कोणार्क रेसिडेन्सी मधील भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी नगरपालिकेच्या कारभाराची चिरफाड केली. यावेळी प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, जगदीश गावकर, ममता वराडकर, पूजा करलकर, पूजा सरकारे, महेश सारंग, आबा हडकर, प्रमोद करलकर आदी उपस्थित होते. यावेळी सुदेश आचरेकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावरही टीका केली. आमदार वैभव नाईक यांनी मालवण नगरपरिषदेच्या कामकाजाचा एकदा आढावा घ्यावा, असे सांगून मागील पाच वर्षात आमदारांच्या हस्ते भूमिपूजन झालेले शहरातील एकही काम अद्याप पूर्ण का होऊ शकले नाही, याची विचारणा आमदारांनी पालिकेतील पदाधिकाऱ्यांना केली आहे का ? शहरातील कचरा डंपिंग ग्राउंडवर जाऊन एकदा त्यांनी येथील परिस्थिती पाहावी, नगरपरिषदेतील शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांनी शहराची बकाल परिस्थिती केली आहे. घनकचरा व्यवस्थापनावर कोट्यावधीचा खर्च करण्यात आला, तरीही घनकचरा अभियानात मालवण नगरपरिषद कमालीची पिछाडीवर गेली आहे.

ट्रॅक्टर आणि जेसीबीसाठीचा लाखोंचा खर्च कोणाचा संसार उभा करण्यासाठी ?

घनकचरा, स्वच्छता, ट्रॅक्टर, जेसीबी यांसारख्या कामावर 3 कोटीहून अधिक रेकॉर्डब्रेक खर्च करण्यात येऊनही पाच वर्षात शहर स्वच्छ का झाले नाही ? असा सवाल सुदेश आचरेकर यांनी केला आहे. आमच्या ताब्यात नगरपालिका असताना २०११ ते २०१५ या कालावधीत घनकचरा व्यवस्थापनावर १ कोटी १३ लाख ४४ हजार रुपये खर्च करण्यात आला. या कालावधीत आम्ही तीन वेळा राज्य स्तरावर तर दोन वेळा विभागीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले. मग आताच्या सत्ताधार्‍यांनी तीन कोटी रुपये खर्च कचरा व्यवस्थापनावर खर्च करूनही शहर एवढे पीछाडीवर का ? जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या भाड्यासाठी २०११ ते २०१५ या कालावधीत एक रुपयांचाही खर्च करण्यात आला नाही. पण विद्यमान सत्ताधार्‍यांनी १४ लाख ७६ हजार रुपये एवढा खर्च जेसीबी आणि ट्रॅक्टर साठी केला आहे. कोणाचा संसार उभा करण्यासाठी एवढा खर्च करण्यात आला ? असा सवाल सुदेश आचरेकर यांनी केला.

क्षुल्लक कामांच्या भूमिपूजनासाठी आमदारांना यावं लागणं, हे दुर्दैव !

मालवण नगरपालिकेकडे अलीकडच्या काळात विकास कामांचा जो निधी आला, तो प्रशासकीय स्वरूपाचा निधी आहे. यामध्ये दलित वस्ती योजना वैशिष्ट्यपूर्ण कामे, रस्ते अनुदान यांसारख्या हेडचा समावेश आहे. हा निधी मिळविण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. शहराच्या लोकसंख्येनुसार सदरचा निधी नगरपालिकेला देण्यात येतो. त्यामुळे मालवण नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या विशेष प्रयत्नातून असा कोणता निधी आणला ते जाहीर करावे, असे सुदेश आचरेकर यांनी सांगून क्षुल्लक कामांच्या भूमिपूजनासाठी आमदारांना येथे यावे लागते, हे दुर्दैव आहे. ही भूमिपूजने स्थानिक ज्येष्ठ नागरिक अथवा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करणे उचित ठरले असते, असा टोलाही सुदेश आचरेकर यांनी लगावला.

“त्या” कामांचे पुढे काय झाले ?

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते मागील पाच वर्षात भूमिपूजन करण्यात आलेली अनेक कामे आज रखडली आहेत. मालवण बसस्थानकाचे पालकमंत्री, आमदार, खासदारांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कामाचे पुढे काय झाले ? साई मंदिर नजीकच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे काम कशासाठी रखडले ? असा सवाल सुदेश आचरेकर आणि गणेश कुशे यांनी केला. मत्स्यालयासाठी दहा कोटींचा निधी आणल्याचे आमदार सांगत आहेत. मग या कामाचे भूमिपूजन का करण्यात आले नाही ? स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स साठी एक रुपयांचा निधी अद्याप पर्यंत आला नसताना त्याचे भूमिपूजन करून येथे कामही सुरू करण्यात आले होते, याची आठवण गणेश कुशे यांनी करून दिली. शहरातील जुने हायमास्ट टॉवर बंद असून ते सुरू करण्याची ऐपत नगरपालिकेची नाही. मात्र आता नवीन हायमास्ट टॉवर बसविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. गणेश चतुर्थी पूर्वी शहरातील स्ट्रीटलाईटवर ८०० एलईडी लाईट बसवणार असल्याचे सत्ताधार्‍यांनी सांगितले होते. याचे पुढे काय झाले ? संबंधित ठेकेदार नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना जुमानत नसल्याचे सांगून पाच वर्षात कोणती विकासकामे पूर्ण केली ? याचे उत्तर देण्याचे आव्हान सुदेश आचरेकर आणि गणेश कुशे यांनी दिले आहे. एक वर्षापूर्वी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष शहरातील भुयारी गटार योजनेच्या रखडलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त करून काम पूर्ण न झाल्यास ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला होता. या घटनेला वर्ष उलटून गेले, मात्र भुयारी गटारच्या कामात एक टक्काही प्रगती झाली नाही. मग त्या ठेकेदाराला काळ्या यादीत का टाकले नाही, असा सवाल गणेश कुशे यांनी केला आहे.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3837

Leave a Reply

error: Content is protected !!