देशभक्तीच्या घोषणांनी दणाणले मालवण; भंडारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे लेझीम ठरले आकर्षण

मालवण : ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘जय जवान, जय किसान’ अशा देशभक्तीपर घोषणांनी मालवण शहराचा परिसर दणाणून गेला. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भंडारी ए. सो. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आणि मालवण पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. देशभक्तीचा उत्साह, विद्यार्थ्यांची शिस्त आणि पारंपरिक लेझीमच्या तालाने प्रभात फेरीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

भंडारी हायस्कूलच्या प्रशालेच्या आवारात ध्वजारोहण झाल्यानंतर प्रभात फेरीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही प्रभात फेरी मार्गक्रमण करत असताना विद्यार्थ्यांनी दिलेल्या देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारावून गेले.

या प्रभात फेरीतील भंडारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे लेझीम नृत्य विशेष आकर्षण ठरले. भरड नाका येथे विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या तालावर अत्यंत शिस्तबद्ध आणि तालबद्ध पद्धतीने लेझीम सादर केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणाने उपस्थित नागरिक भारावून गेले. लेझीम पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे उपस्थितांनी उत्स्फूर्त कौतुक केले.

या लेझीम नृत्यासाठी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ. राधा दिघे आणि सौ. योगिता तारी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

प्रभात फेरीत मालवणचे गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कोतमिरे, शिक्षण विस्तार अधिकारी संजय माने, भंडारी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.देशभक्तीच्या घोषणांसोबतच विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनाने आणि लेझीमच्या आकर्षक सादरीकरणाने मालवणातील स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहाला अनोखा रंग चढला.

error: Content is protected !!