या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा !
सिंधुताईंच्या निधनानंतर “तो” व्हिडीओ होतोय व्हायरल !
कुणाल मांजरेकर
ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे काही वेळापूर्वी पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. “माझं पुस्तक दहावीला अभ्यासक्रमाला कर्नाटकात आहे, पण महाराष्ट्रात नाही. याचं कारण या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा !” असे उद्गार खुद्द सिंधुताईंनी काढले आहेत. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील विदारक परिस्थितीचं कथन करणारा असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
१४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा येथे जन्मलेल्या सिंधुताई सपकाळ या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होतोय. ज्यामध्ये महाराष्ट्रातील विदारक परिस्थितीचं दर्शन घडलं आहे.
“माझं पुस्तक दहावीला अभ्यासक्रमाला कर्नाटकात आहे, पण महाराष्ट्रात नाही. याचं कारण या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा ! मेल्यानंतर माणसं जेथे मोठी होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे. सोन्यासारखी माणसं या मातीत गेलीत, परत नव्याने उगवली. म्हणून तर महाराष्ट्र उभा आहे,” असे उद्गार सिंधुताईनी काढले आहेत.