
मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक; मच्छीमारांच्या गरजेनुसार कामांचे नियोजन करण्याचे निर्देश
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना आता गती मिळणार आहे. बंदरातील प्रस्तावित २२ विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी स्थानिक मच्छीमारांच्या गरजा आणि अपेक्षांना प्राधान्य देत कामांचे नियोजन करावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
मंत्रालयातील त्यांच्या दालनात आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासाबाबत मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आणि महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले उपस्थित होते.

बैठकीत आनंदवाडी मत्स्यबंदरातील प्रस्तावित विकासकामांचे सादरीकरण करण्यात आले. मंत्री राणे यांनी कामांचा सविस्तर आढावा घेतला. “२२ कामांबाबत स्थानिक मच्छीमार संस्थांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांना कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, हे जाणून घ्यावे. त्यानुसार योग्य नियोजन करून विकासकामे निश्चित करावीत,” असे निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासून पुढील तीन महिने बंदरातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्याचे निर्देशही मंत्री राणे यांनी दिले. यासाठी आवश्यक नियोजन आणि प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासासाठी एकूण २२ कामे प्रस्तावित असून, त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करताना स्थानिक मच्छीमारांच्या प्रत्यक्ष गरजा लक्षात घेण्यात याव्यात, असे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले. यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, स्थानिक मच्छीमार संस्था आणि इतर संबंधित घटकांची आनंदवाडी येथे प्रत्यक्ष बैठक घेऊन आवश्यक सुविधांबाबत चर्चा करण्याचे निर्देश देण्यात आले.
मच्छीमारांच्या सहभागातून विकासकामांचे नियोजन केल्यास बंदरातील सुविधा अधिक परिणामकारक आणि उपयोगी ठरतील. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी प्रत्यक्ष आनंदवाडी येथे जाऊन मच्छीमारांच्या सूचना जाणून घेऊन त्यानुसार पुढील कार्यवाही करावी, असेही मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.गाळ काढण्याचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासोबतच उर्वरित २२ विकासकामांनाही गती देऊन त्यासाठीची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. त्यामुळे आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासाला आता निर्णायक गती मिळण्याची शक्यता आहे.






Subscribe to my channel






