यंदाच्या मालवण नगरपालिका निवडणुकीत आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात शिवसेनेने मोठे यश मिळवत पालिकेवर एकहाती सत्ता मिळवली आहे. यात अनेक नवीन चेहरे पालिकेत निवडून गेले आहेत. यातीलच एक असलेल्या प्रभाग १० ब च्या महिला नगरसेविका सौ. भाग्यश्री मयेकर यांनी नागरी सोयीसाठी रस्त्यावर उतरत सामाजिक तत्परता दाखवत “हम भी किसीसे कम नही” हे कृतीतून सिद्ध केले आहे.
शहरातील वॉर्ड क्रमांक १० मधील आडवण-वायरी परिसरात रात्री उशिरा वीज पुरवठा खंडित झाला होता. ही बाब लक्षात येताच शिवसेना शहरप्रमुख व नगरसेवक दीपक पाटकर यांनी तात्काळ वीज कार्यालयाशी संपर्क साधला. यावेळी वॉर्ड क्रमांक १० च्या शिवसेना नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून काम पूर्ण करून घेतले. त्यांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी उत्तम सहकार्य केले. यावेळी तेजस लुडबे, मकरंद मयेकर तसेच मंदार लुडबे (विभाग प्रमुख, शिवसेना) हे देखील उपस्थित होते. या घटनेची वीज कर्मचाऱ्यांनी त्वरित दखल घेत काम जलदगतीने पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत केल्याबद्दल सौ. मयेकर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.