Malvan | महायुतीच्या नारळ लढतीत मधुरा मयेकर विजेत्या

मालवण बंदर जेटीवर महिलांचा जल्लोष ; भाग्यश्री माळकर द्वितीय, हर्षदा खुरंदळे तृतीय

मालवण : नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक उत्सवाला स्पर्धेची रंगत आणि महिलांच्या उत्साहाची जोड मिळाल्याने मालवण बंदर जेटीवर शनिवारी जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. शिवसेना-भाजप महायुतीच्या वतीने आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या भव्य महिला नारळ लढविणे स्पर्धेत मधुरा मयेकर यांनी बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. भाग्यश्री माळकर यांनी द्वितीय, तर हर्षदा खुरंदळे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

स्पर्धेचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. स्पर्धेला महिला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक फेरीत रंगणारी चुरस, नारळाच्या लढतीचा थरार आणि स्पर्धकांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रेक्षकांचा उत्साह यामुळे बंदर जेटीवर अक्षरशः जल्लोषाचे वातावरण होते.

द्वितीय क्रमांक भाग्यश्री माळकर, तृतीय हर्षदा खुरंदळे, चतुर्थ संजना मेस्त्री, पाचवा परी सावजी, सहावा सालिया शेख, सातवा गार्गी मोंडकर आणि आठवा संजना जुवाटकर यांनी पटकावला. सर्व विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

विजेत्यांवर बक्षिसांची बरसात

प्रथम क्रमांकाच्या मधुरा मयेकर यांना सोन्याची नथ, मानाची पैठणी आणि फ्रिज अशी आकर्षक बक्षिसे देण्यात आली. द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या भाग्यश्री माळकर यांना वॉशिंग मशीन, तृतीय क्रमांकाच्या हर्षदा खुरंदळे यांना चांदीचा कुंकवाचा करंडा, तर चतुर्थ क्रमांकाच्या संजना मेस्त्री यांना चांदीचा छल्ला देण्यात आला. पाचव्या व सहाव्या क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी मिक्सर, तर सातव्या व आठव्या क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यात आले. याशिवाय लकी ड्रॉच्या माध्यमातून तब्बल २० स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

नारळी पौर्णिमेच्या उत्सवात महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या स्पर्धेने पारंपरिक सणाला आधुनिक उत्साहाची किनार दिली. महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत नारळ लढविण्याच्या प्रत्येक फेरीत आपली जिद्द आणि उत्साह दाखवून दिला. त्यामुळे मालवण बंदर जेटीवरील हा सोहळा उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सभापती प्रज्ञा चव्हाण, स्वप्नाली नेरुरकर, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, मंदार लुडबे, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरपरिषद महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, शिवसेना महिला आघाडी संघटक तथा नगरपरिषद स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिला सहभागामुळे नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक उत्सवाला विशेष रंगत प्राप्त झाली. नारळाच्या प्रत्येक लढतीसोबत वाढत गेलेली उत्सुकता आणि विजयानंतरचा जल्लोष यामुळे मालवण बंदर जेटीवर नारळी पौर्णिमेचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

error: Content is protected !!