
सर्व माहिती, ठाव ठिकाणे देऊनही पोलीस म्हणतात, “फिर्याद द्या, गुन्हे दाखल करतो”….
उद्या सजग नागरिकांनी अवैध धंदे, दारू, मटका अड्ड्यांची माहिती दिली, तरी पोलिस नागरिकांना फिर्याद दाखल करायला सांगणार का ? मनसे तालुकाध्यक्षांचा सवाल
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर धर्मांतरण प्रकारांबाबत मनसे मार्फत १५ दिवसांपूर्वी मालवण पोलिसांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मालवणात कुठे कुठे हे प्रकार चालतात, याची इत्यंभूत माहिती पोलिसांना देऊन देखील या प्रकाराबाबत पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. या प्रकरणात तुम्ही फिर्याद द्या, कारवाई करतो, असे उत्तर पोलीस निरीक्षकांकडून मिळाल्याची माहिती मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी देत नाराजी व्यक्त केली आहे. उद्या शहरात अनधिकृत धंदे, मटका, जुगार, दारू अड्डे सुरु असल्याचे दिसून आल्यास सजग नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली तर त्यांना देखील फिर्याद देण्याचा सल्ला पोलीस प्रशासन देणार का? असा सवाल करत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेऊन मालवण पोलिसांना तपासाचे सक्त आदेश द्यावेत. उद्या या प्रकारावरून मालवणात धार्मिक तेढ निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी मालवण पोलीस प्रशासन जबाबदार असेल, असेही गॅरी अन्ननसिएशन यांनी म्हटले आहे. पोलिसांच्या याचं वृत्तीमुळे पर्यटन मालवण नगरीत अंमली पदार्थाचा सुळसुळाट झाला आहे का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
मालवण शहर आणि तालुक्यात काही व्यक्ती व संघटनांकडून नागरिकांना विविध प्रकारची आमिषे दाखवून, आर्थिक मदत, नोकरी, शिक्षण, वैद्यकीय सुविधा अथवा इतर लाभांचे आश्वासन देऊन त्यांची दिशाभूल करत अनधिकृत पणे त्यांचे धर्मांतरण केले जात असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. काही ठिकाणी धार्मिक भावना भडकविणे, समाजात फूट पाडणे, मानसिक दबाव निर्माण करणे, खोटी माहिती पसरविणे व नागरिकांचे ब्रेनवॉश करण्याचे प्रयत्न होत असून पोलीस प्रशासनाने याची माहिती घेत कारवाई करण्याबाबत लेखी निवेदन मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी १ जून रोजी मालवण पोलिसांना दिले होते. अशा प्रकारांमुळे मालवण परिसरातील सामाजिक सलोखा, शांतता व कायदा-सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सदर गंभीर प्रकरणाची तात्काळ व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. संबंधित व्यक्ती, संस्था किंवा संघटनांच्या कार्यपद्धतीची तपासणी करण्यात यावी. नागरिकांना आमिषे दाखवून किंवा दबाव टाकून धर्मांतरण केले जात असल्यास त्याची सखोल चौकशी करावी, असेही त्यांनी म्हटले होते.
या निवेदनानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून गॅरी अन्ननसिएशन यांना संपर्क साधून याची माहिती घेण्यात आली. त्यावेळी शहरात व तालुक्यात कुठे कुठे हे प्रकार होतात, त्याची वेळ कोणती असते, याबाबत सविस्तर माहिती गॅरी अन्ननसिएशन यांनी मालवण पोलीस व पोलीस अधीक्षक कार्यालयाला दिली. त्यानंतर मालवण पोलीस निरीक्षक यांनी या प्रकरणात तुम्ही फिर्याद द्या असा सल्ला दिला. आपल्या परिसरात काही चुकीच्या गोष्टी होत असल्यास पोलिसांना त्याची माहिती देणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. त्याप्रमाणे मिळालेल्या माहितीप्रमाणे शहानिशा करुन त्यावर योग्य तो कार्यवाही करणे हे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे. असे असताना मालवण पोलिसांकडून या गंभीर प्रकरणाच्या तपासाबाबत दुर्लक्ष का करण्यात येत आहे, असा सवाल गॅरी अन्ननसिएशन यांनी केला आहे.





Subscribe to my channel






