साधना तावडे करणार मार्गदर्शन ; तरुण तरुणींना नव्या करिअरची वाट दाखवण्याचा प्रयत्न


मालवण : मालवण मधील मुलांमुलींसाठी, युवक युवतींसाठी वर्कशॉप बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, धुरीवाडा, मालवण येथे बुधवार दि. १५ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ वा. या वेळेत बीटबॉक्सिंग विषयावर दोन तासांचे मोफत विशेष सेमिनार आयोजित करण्यात आले आहे. या सेमिनार मध्ये मुळच्या वडाचा पाट येथील साधना तावडे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे केले असून मुंबईतील “पहिली महिला बीटबॉक्सर” म्हणून त्यांची ओळख आहे. “हक से हिंदुस्तान “, “स्पो्टिफाय रॅप 91” अशा मोठ्या कार्यक्रमात तिने आपल्या बीटबॉक्सिंग कलेचे यशस्वीरित्या सादरीकरण केले. या बीटबॉक्सिंग कलेमध्ये महिलांमधून ती महाराष्ट्रातील टॉप टेन मध्ये दुसऱ्या रँकिंगवर आहे.
बीटबॉक्सिंग म्हणजे तोंड, ओठ, जीभ आणि आवाज यांचा वापर करून ड्रम बीट्स, ताल आणि संगीत तयार करण्याची ही कला आहे. या कलेमध्ये जणू आपण स्वतः एक “मानवी ड्रम मशीन” आहोत याचा आनंद घेता येतो आणि तो इतरांनाही देता येतो. यासाठी कोणत्याही वाद्यांची गरज नसते. आपल्या मालवण मधील तसेच सिंधुदुर्गातील मुलांना बीटबॉक्सिंग म्हणजे काय? व त्यातून कसा रोजगार उत्पन्न होतो, याविषयी मार्गदर्शन करण्याची एक संधी या निमित्ताने सेवांगण तर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही कार्यशाळा पूर्णपणे विनामूल्य आहे. या कार्यशाळेत नाव नोंदणीसाठी संजय आचरेकर-9421569704/ 9423946003, डॉ. सुमेधा नाईक -9404924678, लक्ष्मीकांत खोबरेकर-9422434632 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बॅरिस्टर नाथ पै सेवांगण विश्वस्त व कार्यकारिणी मंडळ, धुरीवाडा, मालवण यांनी केले आहे
















Subscribe to my channel




