न्याय हक्कांसाठी लढतानाच सकारात्मक बदलांसाठी देखील सज्ज व्हा !

दांडी येथील कार्यक्रमात आ. वैभव नाईक यांचे पारंपरिक मच्छिमारांना आवाहन

मालवणात मच्छीमार महिलांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

“त्या’ विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी आ. वैभव नाईक यांच्याकडून आर्थिक मदत

कुणाल मांजरेकर

मालवण : मासे खरेदी-विक्री व्यवसायात गेल्या काही वर्षांमध्ये काही स्पर्धात्मक बदल झालेले दिसतात. शासकीय योजनांच्या माध्यमातून या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी मच्छीमार आणि महिलांनी सज्ज व्हायला हवे. मिळालेल्या माशातून आपल्याला अधिकचे उत्पन्न कसे मिळवता येईल हा दृष्टिकोन आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.

मालवण दांडी आवार येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र याठिकाणी विकास अध्ययन केंद्र मुंबई आणि सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मच्छीमार महिलांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विकास अध्ययन केंद्र मुंबई प्रकाशित ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना’ पुस्तिकेचे प्रकाशन आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रवींद्र मालवणकर, विकास अध्ययन केंद्राचे सुरेश शेळके, रेणुका कड, सिंधुदुर्ग जिल्हा गाबित महासंघाचे संघटक चंद्रशेखर उपरकर, सिंधुदुर्ग जिल्हा श्नमजिवी रापण संघाचे सचिव दिलीप घारे, जि. प. सदस्य हरी खोबरेकर, नगरसेविका सेजल परब, कांदळवन विभागाच्या जैव विविधता तज्ज्ञ दुर्गा सावंत-ठिगळे, मालवण तालुका श्रमिक मच्छीमार संघाचे अध्यक्ष छोटु सावजी, उपाध्यक्ष बाबी जोगी, एनएफएफ कार्यकारिणी सदस्य रवीकिरण तोरसकर, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर, महिला जिल्हाध्यक्ष स्वप्नाली तारी, सागरकन्या संस्था अध्यक्ष सुलक्षणा रेवंडकर, सामाजिक कार्यकर्त्या चारुशीला देऊलकर आदी उपस्थित होते.

आ.वैभव नाईक पुढे म्हणाले, आपल्या न्याय हक्कांसाठी लढत असतानाच पारंपारिक मच्छीमार आणि महिलांनी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून नव्या सकारात्मक बदलांसाठी देखील सज्ज रहायला हवे. कणकवली सारख्या ठिकाणी आज मासे विक्रेत्यांची संख्या वाढलेली आहे. ‘ताजे मासे घरपोच सेवा’ देणाऱ्यांची सध्या चलती आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून या व्यावसायिक स्पर्धेला सामोरे जाण्याच्या दृष्टीने मच्छीमारांनी तयारी ठेवली पाहिजे. विकास अध्ययन केंद्र सातत्याने पारंपारिक मच्छीमारांच्या प्रश्नांवर कार्यरत आहे. पारंपारिक मच्छीमारांची चळवळ यशस्वी व्हावी, मच्छीमार महिलांमध्ये सहकार चळवळ रुजावी आणि त्यांचा शाश्वत विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम ही संस्था राबवते आहे. मत्स्य विभागातील अधिकारीसुद्धा मच्छीमारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तत्परता दाखवत आहेत. या साऱ्या वातावरणाचा नजीकच्या काळात मच्छीमारांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास आ. नाईक यांनी व्यक्त केला.

तळाशील येथील लिखिता मालंडकर ही बारावीतील विद्यार्थिनी वडिलांसमवेत मासेमारीला जाऊन शिक्षण पूर्ण करतेय, असा उल्लेख कार्यक्रमात झाला असता आमदार वैभव नाईक यांनी तिच्या कौतुकाखातर पाच हजार रुपयांचे बक्षिस देत तिच्या शैक्षणिक जडणघडणीस प्रोत्साहन दिले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!