स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून महेश कांदळगावकर, भाजपकडून रविकिरण तोरसकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब


मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पालिकेवर शिवसेनेची निर्विवाद सत्ता आल्यानंतर उद्या सोमवार दि. १२ जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष आणि स्विकृत नगरसेवक नियुक्तीसाठी नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे शहरप्रमुख तथा अभ्यासू नगरसेवक दीपक पाटकर यांना संधी मिळणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे. तर नगरपालिकेतील संख्याबळ विचारात घेता शिवसेना आणि भाजपला एक-एक जागा निश्चित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर तर भाजपकडून मच्छिमार नेते रविकिरण उर्फ विकी तोरसकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. उद्याच याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.
मालवण नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने नगराध्यक्ष पदासह २० पैकी १० जागा मिळवत एकहाती सत्ता मिळविलेली आहे. तर भाजपला ५ तर ठाकरे शिवसेना ४ आणि अपक्ष १ असे याठिकाणी संख्याबळ आहे. संख्याबळानुसार शिवसेना आणि भाजप यांच्याकडून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांना स्विकृत नगरसेवक म्हणून संधी मिळणार आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून नाव निश्चीत होणाऱ्या उमेदवाराचाच विजय निश्चीत मानला जात आहे. यामुळे मालवणमध्ये सर्व निवडणूक कार्यक्रम बिनविरोध होण्याची शक्यता आहे. स्विकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून सलग दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले दीपक पाटकर यांचे नाव निश्चीत करण्यात आल्याचीही माहिती पुढे येत आहे.
शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या नावाला पसंती मिळाली आहे. कांदळगावकर यांच्याकडे पालिकेतील अधिकारी ते लोकनियुक्त नगराध्यक्ष असा अनुभव असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. उबाठाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राहिलेल्या कांदळगावकर यांनी आमदार निलेश राणे यांच्या कार्यावर प्रेरीत होऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेकडून नियुक्त करण्यात आलेल्या कमिटीमध्ये कांदळगावकर यांच्यावर महत्वाची जबाबदारी होती. पालिका निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे कांदळगावकर यांचेच नाव निश्चीत झाल्याचे बोलले जात आहे.
भाजपकडून काही माजी नगरसेवकांच्या नावाची चर्चा होती. मात्र भाजप नेतृत्वाकडून धक्कातंत्र वापरत भाजपचे मच्छीमार सेलचे जिल्हाध्यक्ष रविकिरण तोरसकर यांच्या नावावर शिकामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. तोरसकर हे ‘नॅशनल फिश वर्कर्स फोरम’चे सदस्य असून मच्छीमार आंदोलनात नेहमीच सहभागी होत महत्वाचे योगदान देत असत. भाजपकडून त्यांच्या नावाची चर्चा करण्यात आल्याने अनेक इच्छुकांना धक्का बसल्याचे बोलले जात आहे. उद्या होणाऱ्या सभेत या नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे

Subscribe to my channel




