कुणीही फुकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये ; नगरसेविका मेघा गावकर यांचा सल्ला


रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई होणार ; अशा व्यक्ती आढळल्यास फोटोसह पालिकेकडे तक्रार करण्याचेही आवाहन
मालवण : युवा नेते निलेश राणे आमदार झाल्यानंतर मालवण शहरातील कचरा संकलनासाठी ४० कर्मचारी त्यांनी उपलब्ध करून दिले. हीच माणसे आज शहराची स्वच्छता करीत आहेत. २१ जानेवारीला मालवण नगरपरिषदेवर शिवसेनेच्या नगराध्यक्षा व नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांनी आ. निलेश राणे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाजारपेठ व मच्छीमार्केट मध्ये फेरफटका मारून विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानुसार रात्रीच्या कचरा गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मालवणच्या कचरा संकलनाच्या कामाचे सर्व श्रेय आ. निलेश राणे यांचेच असून कुणीही त्याचे फुकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला शिवसेना नगरसेविका मेघा गावकर यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शिवसेनेची सत्ता मालवण नगरपरिषदेवर आल्यानंतर नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी मालवणच्या स्वच्छतेबाबत मार्केटमध्ये पाहणी करून रात्रीच्या कचरा गाडीची व्यवस्था करून दिलेली आहे. गाडी आता रोज कचरा भरून घेऊन जाते व त्याबाबत लोकांना पूर्वसूचना दिलेली आहे. त्यामुळे कोणीही त्याचे फुकाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. तसेच काही विघ्नसंतोषी लोक गाडी कचरा घेऊन गेल्यानंतर कचरा मुद्दाम फेकत आहेत असे निदर्शनात आले आहे. त्यासाठी प्रशासन सीसीटीव्ही फुटेज चेक करत असून त्या लोकांवर सक्त कारवाई व दंड करणार आहे तसेच सदर लोक कचरा फेकताना कोणास आढळल्यास त्यांचे फोटो, गाडीचे फोटो प्रशासनास पाठवावे असे आवाहन शिवसेना पक्षाच्या वतीने करत आहोत, असे मेघा गावकर यांनी म्हटले आहे.

Subscribe to my channel




