सिंधुदुर्गात शिवसेना ठाकरे गटाकडून नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा

जिल्ह्यात संघटन बळकटीसाठी १४ पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी; माजी आ. वैभव नाईकांकडून अभिनंदन

मालवण : ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक पदांवर नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाचे मुखपत्र दै. सामना मधून या नियुक्त्यांची अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या नियुक्त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पक्षाची विचारधारा आणि संघटनात्मक भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या नियुक्त्यांमध्ये चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांची सावंतवाडी विधानसभा संघटक, तर जयेंद्र परुळेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संजय गावडे यांची वेंगुर्ले उपजिल्हाप्रमुख, लक्ष्मण रावराणे यांची वैभववाडी उपजिल्हाप्रमुख, तर रामराव उर्फ चंदन गावकर यांची दोडामार्ग उपजिल्हाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच वसंत खानविलकर यांची वैभववाडी उपजिल्हा संघटक, लक्ष्मण आयनोडकर यांची दोडामार्ग उपजिल्हा संघटक आणि विनोद सांडव यांची मालवण उपजिल्हा संघटक म्हणून नियुक्ती झाली आहे.

राजू राठोड यांची कणकवली तालुकाप्रमुख, रमाकांत मोरे यांची वैभववाडी तालुका संघटक, निशांत तोरस्कर यांची सावंतवाडी तालुका संघटक, तर विजय नाईक यांची वेंगुर्ले तालुका संघटक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय राजेश टंगसाळी यांची कुडाळ उपतालुका संघटक, तर नारायण उर्फ आप्पा मांजरेकर यांची ओबीसी सेल, कुडाळ तालुका संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

error: Content is protected !!