तारकर्ली येथील विनयभंग व मारहाण प्रकरणी निर्दोष मुक्तता

आरोपीच्यावतीने ॲड. स्वरूप नारायण पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले

मालवण : तारकर्ली येथील महिलेचा विनयभंग व महिलेच्या पतीस मारहाण केल्याच्या आरोपातून संजय राधाकृष्ण केळसकर (वय 45, रा. तारकर्ली ता. पोलीस) याची मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने ॲड. स्वरूप नारायण पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले.

दि. 05/10/2017 रोजी संध्याकाळी 5.00 वाजताच्या सुमारास फिर्यादी तिच्या आई व पतीसोबत मालवण कडून त्यांच्याकडील वॅगनार कार मधून तारकर्ली येथे जात असताना ॲमिशन फिश फॅक्टरी जवळ संशयित त्यांच्याकडे दुचाकीवरून आला व फिर्यादी महिलेशी लज्जास्पद वर्तन करून हावभाव केले व निघून गेला, तेव्हा फिर्यादीने चारचाकीने त्याचा पाठलाग करून देवबाग जेटीकडे त्याला अडविले. फिर्यादी व तिचा पती संशयिताला जाब विचारायला गेले असता संशयिताने फिर्यादीस धक्काबुक्की करून फिर्यादीच्या पतीस ढकलून दिले, त्यामुळे फिर्यादीच्या पतीचा हात फ्रॅक्चर झाला.

या घटनेबाबत फिर्यादीने मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर संशयीताच्या विरुद्ध मालवण पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 354-A(3),509,323 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मालवण पोलिसांनी तपासकाम पूर्ण करून मे. मालवण न्यायालयात संशयीताविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणी दरम्याने सरकारपक्षाकडून एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणी अखेर तक्रार दाखल करण्यास झालेला विलंब, फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, तपासातील त्रुटी व आरोपीच्या वतीने करण्यात आलेला युक्तीवाद विचारात घेऊन मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब मालवण यांनी आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

error: Content is protected !!