सावंतवाडीला आदर्श शहर बनविणार; विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही

पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही : विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन; सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण

सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करून ते आदर्श शहर म्हणून विकसित करण्याचा संकल्प असून, शहराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने आयोजित विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

या कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नगरपरिषदेच्या आस्थापनेवरील लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार पात्र ठरलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. याशिवाय शहरातील नरेंद्र डोंगर परिसरात उभारण्यात येणाऱ्या मेडिटेशन व योगा सेंटरचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या नवीन कचरा संकलन वाहनांचे व यंत्रसामग्रीचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, नगराध्यक्षा श्रद्धा भोसले, उपाध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, मुख्याधिकारी विनायक औंधकर, लखमराजे भोसले यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री राणे म्हणाले, आज लोकोपयोगी विकासकामांचे लोकार्पण होत असल्याचा आनंद आहे. ही कामे केवळ पायाभूत सुविधा उभारणारी नसून सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणारी आहेत. शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी आणि नगरपरिषदेने चांगला विकास आराखडा तयार केला आहे. त्यामुळे सावंतवाडी पर्यटनाच्या दृष्टीने अधिक वेगाने विकसित होईल, असा विश्वास आहे.

ते पुढे म्हणाले, आज सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे देताना त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटते. आम्ही नेहमीच जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. शहराचा विकास नागरिकांना प्रत्यक्ष जाणवला पाहिजे. त्यासाठी दर्जेदार विकासकामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अधिकाधिक चांगले प्रकल्प आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

भाजी मार्केट व पार्किंग सुविधेमुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार

कार्यक्रमात आमदार दीपक केसरकर यांनी नगरपरिषदेच्या कामकाजाचे कौतुक करताना सांगितले की, शहरात आधुनिक सुविधांनी युक्त भाजी मार्केटची उत्कृष्ट इमारत उभारली जात आहे. तसेच पार्किंग व्यवस्थेतही मोठी सुधारणा होणार आहे. शहराच्या विकासासाठी पालकमंत्री नितेश राणे भरघोस निधी उपलब्ध करून देत असल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषद कटिबद्ध

नगराध्यक्षा श्रीमती श्रद्धा भोसले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजचा दिवस सावंतवाडीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे मिळत आहेत, नरेंद्र डोंगर येथे योगा आणि मेडिटेशन सेंटर उभारले जात आहे तसेच अनेक विकासकामांचा शुभारंभ होत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही त्या म्हणाल्या.

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी सांगितले की, आज नियुक्तीपत्र प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसत आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी प्रास्ताविकातून नगरपरिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती दिली.

error: Content is protected !!