पालकमंत्री नितेश राणेंची “धमाल” ; रणांगणात उतरण्यापूर्वीच विरोधकांकडून “तलवार म्यान”

सिंधुदुर्गात जि. प. च्या ५ आणि पं. स. च्या ६ जागा बिनविरोध ; भाजपच्या १० तर शिवसेनेच्या एका जागेचा समावेश

पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्व आणि कर्तृत्वावर मोहोर ; महायुतीची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल….

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर

नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये “बिनविरोध” पॅटर्न ची मोठी चर्चा झाली होती. सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत देखील महापालिकांचा हा बिनविरोध पॅटर्न अंमलात आला आहे. भाजपचे युवा नेते आणि राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने निवडणूक रिंगणात उतरण्यापूर्वीच जि. प. च्या ५० जागांपैकी ५ जागा जिंकून १० % लढाई जिंकली आहे. यात पालकमंत्र्यांच्या कणकवली, देवगड आणि वैभववाडी विधानसभा मतदार संघातील ४ जागांचा समावेश आहे. तर पंचायत समितीच्या देखील १०० पैकी पालकमंत्र्यांच्या मतदार संघातील ६ जागा भाजप महायुतीने बिनविरोध जिंकल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्व आणि कर्तृत्वावर मोहोर उमटवली गेली आहे.

पालकमंत्री नितेश राणे हे राज्यातील आक्रमक व डॅशिंग युवा नेते म्हणून ओळखले जातात. निवडणूक रणनीतीकार म्हणून त्यांची विशेष ओळख असून आपल्या संघटन कौशल्यामुळे त्यानी आजवर अनेक निवडणुकांमध्ये नेत्रदीपक यश मिळवले आहे. सध्या राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. खासदार नारायण राणे यांच्या सूचनेनुसार ही निवडणूक सिंधुदुर्गात महायुतीमार्फत लढवली जात असून नितेश राणे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेच्या तब्बल ५ तर पंचायत समितीच्या ६ जागा बिनविरोध करून नितेश राणे यांनी आपल्या कर्तृत्व व नेतृत्वाची झलक पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.

जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेनेचे वर्चस्व

जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने ५ जागांवर बिनविरोध विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड दिला आहे. यामध्ये भाजपच्या ४ आणि शिवसेनेच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांमध्ये खारेपाटणमधून प्राची इस्वलकर (भाजप), जाणवलीतून सौ. रुहिता राजेश तांबे (शिवसेना), पडेल (देवगड) मधून श्रीमती सुयोगी रवींद्र घाडी (भाजप), बापर्डे (देवगड) मधून सौ. अवनी अमोल तेली (भाजप) आणि बांदा येथून श्री. प्रमोद कामत (भाजप) यांचा समावेश आहे.

पंचायत समितीतही ‘कमळ’ फुलले

पंचायत समितीच्या ६ जागांवर देखील महायुतीने वर्चस्व राखले आहे. नितेश राणे यांच्या राजकीय व्यूहरचनेसमोर विरोधकांनी नांगी टाकल्याने या जागा बिनविरोध झाल्या आहेत. कणकवली तालुक्यातील बिडवाडी येथून सौ. संजना संतोष राणे (भाजप) आणि वरवडे येथून श्री. सोनू सावंत (भाजप) हे बिनविरोध निवडून आले आहेत. देवगड तालुक्यातील पडेल मतदारसंघातून अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप), नाडणमधून गणेश सदाशिव राणे (भाजप) आणि बापर्डे येथून संजना संजय लाड (भाजप) यांनी यश मिळवले आहे. तसेच वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे मतदारसंघातून सौ. साधना सुधीर नकाशे (भाजप) यांची बिनविरोध निवड झाली आहे.

राजकीय व्यूहरचना आणि विरोधकांची माघार

खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ना. नितेश राणे यांच्या प्रत्यक्ष व्यूहरचनेमुळे जिल्ह्यातील अनेक जागांवर विरोधकांनी आपली उमेदवारी मागे घेतली. विशेषतः कणकवली मतदारसंघात राणे यांचा मोठा प्रभाव पाहायला मिळत आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत २७ जानेवारी असल्याने, शेवटच्या टप्प्यात पालकमंत्री विरोधकांना आणखीन काही धक्के देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा विजय म्हणजे जनतेचा राणे कुटुंबीयांवरील विश्वास आणि महायुतीच्या कामाची पावती आहे. उरलेल्या ४५ जागांवरही आमचा करिष्मा कायम राहील, अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!