
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून ४९.९९ लाखांचा निधी; पर्यटन व्यावसायिकांसह स्थानिकांनी मानले आभार
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या चिवला बीच येथील निलरत्न बंगला ते कुरण या रस्त्याच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी करण्यात आला. नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ झाला.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर सन २०२५-२६ योजनेतून या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी ४९ लाख ९९ हजार ७७५ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चिवला बीचच्या पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या या रस्त्याचे नूतनीकरण होत असल्याने स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि पर्यटन क्षेत्रातील घटकांनी समाधान व्यक्त केले.सुमारे १५ वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या पुढाकारातून चिवला बीच परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी हा रस्ता तयार करण्यात आला होता. या रस्त्यामुळे परिसरातील पर्यटन व्यवसायाला मोठी मदत झाली. मात्र कालांतराने रस्ता खराब झाल्याने पर्यटक तसेच स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर रस्त्याचे नूतनीकरण होणे गरजेचे होते. हे काम मार्गी लागल्याने चिवला बीच परिसरातील पर्यटनाला अधिक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष साटविलकर, नगरपालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, महिला व बालकल्याण उपसभापती अश्विनी कांदळकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, ललित चव्हाण, शर्वरी पाटकर, दर्शना कासवकर, सिद्धार्थ जाधव, मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, परशुराम पाटकर, बबन शिंदे, जॉन नरोन्हा, मोहन वराडकर, विश्वास गावकर, निकीत वराडकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
पर्यटन व्यावसायिकांकडून समाधान
स्थानिक पर्यटन व्यावसायिक प्रसन्ना मयेकर यांनी रस्त्याच्या नूतनीकरणाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार निलेश राणे आणि नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे आभार मानले. ते म्हणाले की, चिवला बीच परिसरातील पर्यटन वाढत असताना खराब झालेल्या रस्त्यामुळे पर्यटक आणि स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. पूर्वी या रस्त्याच्या निर्मितीमुळे चिवला बीचवरील पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली होती. मात्र कालांतराने रस्ता खराब झाल्याने पर्यटकांमध्ये नाराजी निर्माण होत होती. आता नूतनीकरणाचे काम सुरू झाल्याने ही समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी या कामासाठी पाठपुरावा केल्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले. तसेच आगामी काळात चिवला बीच परिसरात एलईडी पथदिवे कार्यान्वित होणार असल्याची माहिती देत, त्यामुळे परिसरातील पर्यटन सुविधांमध्ये आणखी भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.







Subscribe to my channel






