सलाम सिंधुदुर्ग पोलिसांना ; दामिनीच्या मारेकऱ्याला अवघ्या पाच तासांत पकडले!

वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथून संशयित साईल धुरी पाच तासात ताब्यात : सात दिवसांची पोलीस कोठडी

वर्दे-कडावल हत्या प्रकरणाचा पोलिसांनी वेगाने छडा लावला; सहा पथके मैदानात, सीसीटीव्ही आणि दुचाकीच्या क्रमांकावरून संशयिताचा माग काढला

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी

संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील २३ वर्षीय दामिनी किरण पालव हत्या प्रकरणात पोलिसांनी वेगवान तपासाची चुणूक दाखवली आहे. महाविद्यालयीन युवतीची निर्घृण हत्या करून पसार झालेल्या संशयित साहिल विश्राम धुरी (वय २२, रा. मठ, ता. वेंगुर्ला) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनेनंतर काही तासांतच ताब्यात घेतले. सहा पोलीस पथकांची शोधमोहीम, प्रत्यक्षदर्शीने दिलेली माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि मोटारसायकलच्या क्रमांकाचा माग काढत पोलिसांनी संशयितापर्यंत धडक मारली. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे कौतुक होत असून, या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

शनिवारी, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी वर्दे-कडावल येथे दामिनी पालव हिची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. घटनेनंतर संशयित पसार झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी वेळ न दवडता तपासाची सूत्रे हाती घेतली.पोलीस अधीक्षक डॉ. दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोनी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची सहा पथके संशयिताच्या शोधासाठी रवाना झाली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विविध दिशांनी तपास सुरू केला.

घटनास्थळाजवळ काळ्या रंगाचा शर्ट घातलेला युवक काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवरून कडावलच्या दिशेने जाताना दिसल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना दिली. या माहितीला आधार मानून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.डिगस येथील दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये संशयिताच्या वर्णनाशी जुळणारा युवक आणि मोटारसायकल दिसून आली. दुचाकीच्या क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी तपास पुढे नेला. या धाग्याचा माग काढत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक थेट वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथील धुरीवाड्यात पोहोचले.

संशयित ताब्यात; महत्त्वाचे पुरावे जप्त

पोलिसांनी साहिल विश्राम धुरी याला ताब्यात घेऊन कुडाळ पोलिसांच्या स्वाधीन केले. हत्येसाठी वापरल्याचा संशय असलेला चाकू, मोटारसायकल, रक्ताचे डाग असलेले कपडे, दामिनीचा मोबाईल आणि संशयिताचा मोबाईल अशा महत्त्वाच्या वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. या पुराव्यांच्या आधारे तसेच पुढील चौकशीतून घटनेपूर्वीचा घटनाक्रम, हत्येमागील नेमके कारण आणि गुन्ह्याशी संबंधित इतर बाबींचा उलगडा होण्याची अपेक्षा आहे.

एलसीबीच्या पथकाची महत्त्वपूर्ण कामगिरी

पोलीस अधीक्षक डॉ. दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोनी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, अनिल हाडळ, सावंत आणि पथकातील अन्य अधिकारी व अंमलदारांनी संशयिताचा शोध घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

गंभीर गुन्ह्यानंतर तातडीने तपासाची चक्रे फिरवणे, उपलब्ध माहितीचे विश्लेषण करणे आणि सीसीटीव्हीच्या मदतीने संशयितापर्यंत पोहोचणे, या पोलिसांच्या समन्वित कारवाईचे कौतुक होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेली तत्परता तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे.

प्रेमाला नकार दिल्याच्या रागातून हत्या केल्याचा संशय

प्राथमिक माहितीनुसार, दामिनी आणि संशयिताची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. संशयिताने तिच्याकडे प्रेमाचा प्रस्ताव मांडला होता; मात्र तिने नकार दिला होता. दामिनीचे लग्न ठरल्याच्या कारणावरूनही संशयिताच्या मनात राग निर्माण झाला होता का, या दिशेने तपास सुरू आहे. प्रेमाला नकार दिल्याच्या रागातून हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असला, तरी नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे.

दामिनीच्या हत्येने सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संशयिताला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असले, तरी या प्रकरणाचा सखोल तपास करून गुन्ह्याची संपूर्ण पार्श्वभूमी उघड करणे महत्त्वाचे ठरणार आहे.संशयिताचा वेगाने माग काढणाऱ्या सिंधुदुर्ग पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत असून आता पुढील तपासातून दामिनीला न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!