राजन वराडकर यांनी वाचला मुख्याधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेचा पाढा !

अद्याप सुरू न झालेली गटार खोदाई, बंद स्ट्रीटलाईट, कचऱ्याचा प्रश्न, रॉकगार्डन, स्मशानभूमी अस्वच्छतेकडे वेधले लक्ष

मालवण शहराच्या समस्या तीव्र होत असताना मुख्याधिकारी सुशेगात असल्याचा केला आरोप

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण नगरपालिकेवर पाच महिने प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांकडे प्रशासक पदाची जबाबदारी देण्यात आली असतानाही त्यांना शहर विकासाचे कोणतेही सोयरसुतक नाही. पावसाळा जवळ आला असतानाही पावसाळ्यापूर्वी दोन महिने सुरू होणारी गटार खोदाई अद्याप सुरू झालेली नाही. पालिकेने दररोज नागरिकांच्या घरातून कचरा उचलण्याचा ठेका दिलेला असताना सुद्धा आठ- आठ दिवस काही भागात कचऱ्याची गाडी देखील जात नाही. अनेक भागातील स्ट्रीट लाईट बंद असून रॉकगार्डन, स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी दरमहा लाखभर रुपये मोजले जात असतानाही दोन्ही ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासक म्हणून ही सर्व कामे करून घेण्याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांवर असतानाही एकाही ठेकेदारावर दंडात्मक कारवाई का करण्यात आलेली नाही ? असा सवाल माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी उपस्थित केला आहे. शहराच्या समस्या तीव्र होत असतानाही मुख्याधिकारी संतोष जिरगे सुशेगात असून ठेकेदारांशी असलेले संबंध जपण्यात ते मग्न असल्याची टीकाही श्री. वराडकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

येथील हॉटेल कान्हा मध्ये ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राजन वराडकर म्हणाले, घनकचरा व्यवस्थापनासाठी नगरपालिकेने ठेकेदार नेमताना त्याने दररोज प्रत्येक घराघरात जाऊन कचरा उचलण्याची अट करारात नमूद केली आहे. पण प्रत्यक्षात अशा प्रकारे कचरा उचलला जातो का ? शहरातील काही भागात आठ आठ दिवस कचरा उचलला जात नाही. शहरात अनेक ठिकाणी लोकांनी स्वतः डम्पिंग कॉर्नर निर्माण केले आहेत. जर कचऱ्याची गाडी लोकांच्या दारात जात असेल तर शहरात ठिकठिकाणी असे डम्पिंग कॉर्नर उभे राहिले असते का ? यामध्ये नागरिकांचा दोष काय ?आज अनेक भागात कचरा साठून दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा ठेकेदार कधीही पालिकेत येत नाही. आला तर बिल घ्यायला, असे असताना कराराचा भंग केला म्हणून मुख्याधिकाऱ्यांनी कितीवेळा या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली ? असा सवाल राजन वराडकर यांनी उपस्थित केला आहे.

ज्याप्रमाणे पालिकेने शहरात घरपट्टी वसुली केली, त्याप्रमाणे लोकांना सुविधा देणे पालिकेचे काम नाही का ? शहरात अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद आहेत. याबाबत नगरसेवक आणि नागरिकांनी पालिकेत रजिस्टर मध्ये तक्रारी नोंद केल्या असून महिनोंमहिने या तक्रारींची दखल घेतली जात नाही. अनेक ठिकाणी स्ट्रीटलाईट, हायमास टॉवरचे टायमर बदलले असून ते व्यवस्थित करण्यास पालिकेला वेळ नसल्याने दिवसरात्र स्ट्रीट लाईट सुरू असतात. त्यामुळे स्ट्रीटलाईटची बिले वाढत आहेत. तरीदेखील मुख्याधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. रॉकगार्डनमध्ये यापूर्वी देखभालीचा ठेका असलेल्या व्यक्तीने गार्डन नीटनेटके ठेवले होते. मात्र आताच्या ठेकेदाराने गार्डनची देखभाल नीट ठेवलीय का ? दरमहा गार्डन आणि स्मशानभूमीच्या देखभालीसाठी लाखभर रुपये खर्च केला जातो, पण रॉकगार्डन आणि शहरातील स्मशानभूमींची अवस्था काय ? असा सवाल राजन वराडकर यांनी केला.

गटार खोदाई केव्हा करणार ?

दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी दोन महिने अगोदर गटारे आणि व्हाळ्यांची कामे सुरू केली जात होती. पण आता अर्धा मे महिना संपत आला तरीही गटार खोदाई अद्याप पर्यंत सुरू केलेली नाही. हवामान खात्याने यंदा मान्सून दहा दिवस अगोदर येणार असे सांगितले आहे. त्यामुळे गटार आणि व्हाळ्या खोदायचे काम यापूर्वी सुरू होणे आवश्यक होते. परंतु अद्यापही हे काम सुरु न झाल्याने उद्या लोकांच्या घरादारात आणि दुकानात पावसाचे पाणी शिरल्यास त्याला जबाबदार कोण ? या प्रश्नाचे उत्तर मुख्याधिकारी देऊ शकतील का ? असा सवाल राजन वराडकर यांनी केला आहे.

यापूर्वीच्या मुख्याधिकार्‍यांनी ऑनलाइन पद्धतीने २५ लाख रुपये खर्च करून कपाटे मागविली होती. त्यातील काही कपाटे अद्यापही वापराविना पडून आहेत. हा जनतेच्या पैशाचा अपव्यय नाही का ? मुख्याधिकार्‍यांनी अलीकडे ऑनलाइन पद्धतीने कचऱ्यासाठी स्टीलची डस्टबीन आणली आहेत. या डस्टबीन शहरात लावल्या. पण त्यातील कचरा केव्हा उचलणार ? या प्रश्नांची उत्तरे मुख्याधिकारी देऊ शकतील का ? मागील पाच महिन्यांपासून प्रशासक म्हणून मुख्याधिकाऱ्यांकडे सर्व अधिकार आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींची पूर्तता करण्याची जबाबदारी त्यांची आहे की आलेले पैसे खर्च करायचे एवढेच काम मुख्याधिकाऱ्यांचे आहे ? असे प्रश्न राजन वराडकर यांनी उपस्थित केले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!