
आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन; मंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे यांच्यासह उद्योजकांची उपस्थिती
कुडाळ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या कोकण विभागीय कार्यालयाचा शुभारंभ कुडाळ येथे आमदार प्रमोद जठार यांच्याहस्ते करण्यात आला.
‘स्वप्न सिंधुदुर्गाचे, संकल्प उद्योजकांचे’ आणि ‘गाव तेथे उद्योजक’ या संकल्पनेला पुढे नेत कोकणातील उद्योग, व्यवसाय आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी हे विभागीय कार्यालय महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे. स्थानिक तरुणांना उद्योग-व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योजकांना आवश्यक मार्गदर्शन मिळवून देणे आणि गावागावात उद्योगनिर्मितीला प्रोत्साहन देणे, या दिशेने कार्यालयाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे आणि आमदार प्रमोद जठार यांनी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले. कोकणातील युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून रोजगारनिर्माते होण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

कोकणात नैसर्गिक साधनसंपत्ती, पर्यटन, कृषी, मत्स्यव्यवसाय, प्रक्रिया उद्योग आणि सेवा क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या संधींचा स्थानिक पातळीवर प्रभावी वापर करून सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने चेंबरचे कोकण विभागीय कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, आशिष पेडणेकर, करुणाकर शेट्टी, रायवेंद्र बी. एस., डॉ. संतोष राणे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक उद्योजक, युवा उद्योजक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावागावात उद्योजक घडवून स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना देण्याचा संकल्प या कार्यालयाच्या माध्यमातून पुढे नेण्यात येणार असून, कोकणातील उद्योगविश्वाला नवी दिशा आणि सिंधुदुर्गच्या आर्थिक विकासाला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.






Subscribe to my channel






