खा. नारायण राणेंच्या प्रमुख उपस्थितीत खा. नारायण राणेंच्या प्रमुख उपस्थितीत राणे समर्थकांचे शक्तीप्रदर्शन ; कणकवलीत भव्य मेळावा होणार


मालवण | कुणाल मांजरेकर
१९९० पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावरील अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचे राजकीय महत्व कमी करण्याचा प्रयत्न जिल्ह्याच्या राजकारणात सुरु असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मागील ३५ वर्षे केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर राज्याच्या राजकारणातील बुलंद तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासदार नारायण राणे यांना नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारापासून दूर ठेवण्यात आले. एवढेच नाही तर सिंधुदुर्गात राणे बंधू आमने सामने असल्याचे चित्र देखील रंगवण्यात आले. या पार्श्वभूमीवर राणे समर्थकांची एकजूट आणि ताकद दाखवून देण्याच्या उद्देशाने उद्या (रविवारी) जिल्ह्यात दाखल होत असलेल्या खासदार नारायण राणेंच्या दौऱ्याच्या निमित्ताने राणे समर्थकांचे शक्ती प्रदर्शन दिसून येणार आहे. जिल्ह्याच्या सीमेवर बांदा येथे खा. नारायण राणे यांचे राणे समर्थकांच्या वतीने भव्य स्वागत केले जाणार असून त्यानंतर कणकवलीत राणे समर्थकांचा मेळावा होणार आहे. या शक्ती प्रदर्शनाच्या निमित्ताने राणे समर्थकांच्या स्टेट्स वर “जय नारायण” चे बॅनर झळकले असून उद्याच्या राणे समर्थकांच्या एल्गाराकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. उद्या खा. राणे यांच्या सोबत सौ. नीलम राणे, आमदार निलेश राणे व पालकमंत्री नितेश राणे देखील असतील, अशी माहिती मिळाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक असली की माजी मुख्यमंत्री नारायण राणे हेच त्याच्या केंद्रस्थानी असायचे. मात्र नुकत्याच झालेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत खासदार नारायण राणे हे प्रचारापासून अलिप्त होते. त्याचा फटका मालवण नगरपालिका व कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपला बसला. तसेच या निवडणुकीत पालकमंत्री नितेश राणे हे भाजप तर आमदार निलेश राणे शिवसेनेकडून प्रचाराच्या रिंगणात असल्याने राणे बंधू एकमेकांच्या विरोधात असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते. मात्र दोन्ही राणे बंधूनी आम्ही एकसंघ असून फक्त आपापल्या पक्षाची भूमिका मांडत असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.
मात्र राणे कुटुंब व राणे समर्थक एकसंघ असल्याचे दाखवण्याच्या उद्देशाने रविवारी सिंधुदुर्गात राणे समर्थकांचे मोठे शक्ती प्रदर्शन होत आहे. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास बांदा येथे खा. नारायण राणे यांचे स्वागत होणार असून त्यानंतर कणकवली येथे होणाऱ्या खा. राणे यांच्या जाहीर सभेतून राणे समर्थकांचे भव्य शक्तीप्रदर्शन होणार आहे. त्यातून राणे विरोधकाना योग्य तो संदेश दिला जाणार आहे
















Subscribe to my channel




