चिवला बीच समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण करा; गझिबो पुन्हा उभारा

मनसे शहराध्यक्ष सागर जाधव यांची मालवण नगरपालिकेकडे निवेदनाद्वारे मागणी

मालवण : चिवला बीच समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच समुद्रकिनाऱ्यावर पूर्वी असलेला गझिबो पुन्हा त्याच ठिकाणी नव्याने साकारावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मालवण शहराध्यक्ष सागर प्रकाश जाधव यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी मालवण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, चिवला बीच समुद्रकिनारी पूर्वी गझिबो उभारण्यात आला होता. मात्र, कालांतराने वादळी वारे आणि पावसामुळे हा गझिबो नष्ट झाला. सद्यस्थितीत त्या ठिकाणी गझिबोचा पाया मात्र अस्तित्वात आहे. पर्यटकांसाठी चिवला बीच हे मालवणमधील महत्त्वाचे आकर्षण असून, समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी त्या ठिकाणी पूर्वीच्या गझिबोच्या पायावर पुन्हा नव्याने आकर्षक गझिबो साकारावा, अशी मागणी सागर जाधव यांनी केली आहे.

चिवला बीचचे सुशोभीकरण झाल्यास स्थानिक पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच पर्यटकांसाठी समुद्रकिनाऱ्यावर आणखी एक आकर्षक पर्यटनस्थळ उपलब्ध होईल. त्यामुळे नगरपरिषदेने या मागणीचा सकारात्मक विचार करून चिवला बीचच्या सुशोभीकरणासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा मनसेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

error: Content is protected !!