सा. बां. अधिकाऱ्याला धक्काबुक्की भोवली ; तारकर्ली सरपंचांवर गुन्हा दाखल

सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ आणि धमकावल्याचा आरोप

कुणाल मांजरेकर

मालवण : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन कनिष्ठ अभियंत्यास शिवीगाळ, धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तारकर्ली सरपंच सौ. स्नेहा जितेंद्र केरकर यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कनिष्ठ अभियंता नितीन दाणे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना मंगळवारी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास घडली होती. सरपंच सौ. केरकर आपल्या मागण्यांसाठी सोमवार पासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणास बसल्या होत्या. मंगळवारी दुपारी आपली तब्येत बिघडल्याची तक्रार त्यांनी संबंधित कार्यालय प्रमुखाकडे केली होती. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबतची कल्पना घेऊन तपासणीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र सायंकाळपर्यंत वैद्यकीय अधिकारी उपोषण स्थळी दाखल न झाल्याने सौ. केरकर यांचा पारा चढला. त्यांनी थेट कार्यालयात जाऊन अद्याप पर्यंत डॉक्टर का आले नाहीत ? अशी विचारणा केली. यावर शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिल्याचे कनिष्ठ अभियंता श्री. दाणे यांनी सांगितले. यावेळी सौ. केरकर यांनी आपणाला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच कॉलर ला हात घालून टेबलावरील कागद आणि आपला मोबाईल भिरकावला, अशी तक्रार श्री. दाणे यांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा मालवण पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार सौ. केरकर यांच्यावर भादवि कलम ३५३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौ. केरकर या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. उपचार पूर्ण झाल्यावर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांनी दिली आहे. याबाबतचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण करीत आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!