पावसाच्या खंडाने भातशेती उद्ध्वस्त; आ. निलेश राणेंकडून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून थेट पाहणी

नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत घेतला वस्तुनिष्ठ आढावा; शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून जाणून घेतल्या अडचणी

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर

पावसाने प्रदीर्घ खंड घेतल्याने भातशेतीवर संकट ओढावले असताना महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वतीने शेतकऱ्यांना केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष शेताच्या बांधावर पोहोचून नुकसानीची पाहणी करण्यात आली. मतदारसंघातील विविध भागांतील बाधित भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी करत पिकांची स्थिती जाणून घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, झालेली पीकहानी आणि सध्याची परिस्थिती समजून घेण्यात आली.

पावसाच्या लांबलेल्या खंडामुळे भातपिकांवर निर्माण झालेल्या परिणामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आल्याने प्रशासनाकडून नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेण्याच्या प्रक्रियेलाही महत्त्व प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवून नुकसानग्रस्त भागाची वस्तुस्थिती समोर आणण्यावर भर देण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, श्री. संजय पडते, श्री. काका कुडाळकर, प्रांताधिकारी सौ. ऐश्वर्या काळुसे, कुडाळ सभापती श्री. मिलिंद नाईक, जिल्हा परिषद सदस्य सौ. दीपलक्ष्मी पडते, श्री. दीपक नारकर, श्री. रुपेश कानडे, श्री. विनायक राणे तसेच संबंधित अधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!