
युवा उद्योजकाला मोठी जबाबदारी; व्यापार, उद्योग, कृषी व सेवा क्षेत्राच्या विकासासाठी मिळाली बहुमोल संधी
मालवण : मालवणच्या उद्योजकीय क्षेत्रासाठी अभिमानाची आणि जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग, कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्राची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर (MACCIA)च्या गव्हर्निंग कौन्सिलवर मालवण तालुक्यातील महान गावचे युवा उद्योजक संग्राम सुधीर साळसकर यांची ‘स्वीकृत सदस्य’ (Co-opted Member) म्हणून नियुक्ती झाली आहे. २०२६-२०२८ या कार्यकाळासाठी त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महाराष्ट्र चेंबरच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर गव्हर्निंग कौन्सिलची नव्याने रचना करण्यात आली. या प्रक्रियेत संग्राम साळसकर यांच्या अनुभवाची आणि कार्यक्षमतेची दखल घेत त्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. चेंबरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी त्यांच्या नियुक्तीचे अधिकृत पत्र देत नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्राच्या उद्योगविश्वात काम करण्याची संधी
गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य म्हणून संग्राम साळसकर यांना महाराष्ट्रातील व्यापारी, उद्योजक, कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्राशी निगडित विविध प्रश्नांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. चेंबरच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी धोरणात्मक पातळीवर योगदान देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.
ग्रामीण भागातून उद्योजकीय वाटचाल करत राज्यस्तरीय प्रतिष्ठित संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलपर्यंत मजल मारणाऱ्या साळसकर यांची नियुक्ती ही मालवणसह सिंधुदुर्गातील युवा उद्योजकांसाठी प्रेरणादायी मानली जात आहे.
मालवणच्या उद्योजकीय क्षमतेला राज्यस्तरीय व्यासपीठ
महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच व्यापार-उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर सातत्याने कार्यरत आहे. अशा प्रतिष्ठित संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलवर मालवणच्या युवा उद्योजकाची नियुक्ती झाल्याने मालवणच्या उद्योजकीय क्षमतेला राज्यस्तरीय व्यासपीठ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
संग्राम साळसकर यांच्या नियुक्तीबद्दल उद्योग, व्यापार तसेच सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नव्या जबाबदारीच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील उद्योजकांच्या प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळवून देतानाच महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी साळसकर प्रभावी योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






Subscribe to my channel






