कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघातर्फे ११ जून रोजी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

मालवण : कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ कट्टा, मालवण यांच्या वतीने भंडारी समाजातील १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि दशावतार कलेचा सन्मान करण्यासाठी बुधवारी ११ जून रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात समाजबांधवांना एकत्र येण्याचे आणि कला-संस्कृतीचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यावर्षी १० वी आणि १२ वी च्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या कट्टा पंचक्रोशीतील आंबेरी, काळसे, धामापूर, बागवाडी, पेंडूर, पराड, गुरामवाड, वडाचापाट, मसुरे, गोळवण, नांदोस, वराड, तळगाव, सुकळवाड आणि कट्टा येथील भंडारी समाजातील विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल. “आजचे हे विद्यार्थी उद्याचे समाजाचे आधारस्तंभ आहेत, त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.

भंडारी समाजातील दशावतारी कलावंतांना प्रोत्साहन मिळावे, आपली समृद्ध लोककला जपली जावी आणि ती पुढील पिढीपर्यंत पोहोचावी या उदात्त हेतूने एक विशेष दशावतार नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. भंडारी समाजाच्याच दशावतारी कलावंतांद्वारे ‘उषा स्वप्न बाणासूर’ हे नाटक सादर केले जाणार असून, या सर्व कलावंतांना भंडारी समाजाचे सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मानित केले जाईल.

११ जून रोजी दुपारी ३ वाजता गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ, सायंकाळी ६.३० वाजता विशेष दशावतार नाट्यप्रयोग ‘उषा स्वप्न बाणासूर’, रात्री नाटकाचा आनंद घेतल्यानंतर सर्व रसिक प्रेक्षक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.हा केवळ एक सत्कार सोहळा नसून समाजातील गुणवंतांना प्रोत्साहन देण्याचा आणि पारंपरिक कलेचे संवर्धन करण्याचा सामूहिक उपक्रम आहे. आपण दिलेली प्रत्येक देणगी एखाद्या विद्यार्थ्याच्या भविष्याला बळ देणारी ठरेल. समाजहिताच्या या कार्यासाठी सर्व समाजबांधवांनी आपल्या परीने उदार हस्ते आर्थिक मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. देणगीसाठी संपर्क/जीपे नंबर :९७६६४१९८१९ (सुरेश कांबळी). कट्टा पंचक्रोशीतील सर्व भंडारी समाजबांधवांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघातर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!