बेळणे खुर्दमध्ये करपलेल्या भातशेतीची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी

शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून घेतला परिस्थितीचा आढावा; पाणी अडवणूक, साठवणूक व भूजल पुनर्भरणाला गावपातळीवर प्राधान्य देण्याचे आवाहन

कणकवली : पावसाचा प्रदीर्घ खंड आणि पाण्याअभावी भातशेती करपण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झालेल्या बेळणे खुर्द येथील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. चेतन चाळके आणि रामकृष्ण चाळके यांच्या शेतातील करपलेल्या भात पिकाची पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

पावसाअभावी भात पिकाला मोठा फटका बसत असून पीक करपण्यास सुरुवात झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना दिली. यावेळी सरपंच अविनाश राजाराम गिरकर यांनी गावातील शेतीची स्थिती तसेच पाण्याच्या उपलब्धतेबाबतची सद्यस्थिती पालकमंत्र्यांसमोर मांडली.

धरणातील पाणी कॅनॉलद्वारे उपलब्ध करण्याची मागणी

बेळणे खुर्द परिसरात धरण असून यापूर्वी पाटाच्या माध्यमातून धरणातील पाणी शेतीसाठी उपलब्ध होत होते. मात्र, सध्या पाण्याची उपलब्धता नसल्याने शेतीसमोरील अडचणी वाढल्या आहेत. धरणातील पाणी कॅनॉलच्या माध्यमातून शेतीसाठी उपलब्ध करून दिल्यास गावातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सिंचनाचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो, अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा घेतला आढावा

यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, गेल्या वर्षीची आणि यंदाची परिस्थिती, पावसातील फरक तसेच सध्याच्या परिस्थितीची तीव्रता प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली जात आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संपूर्ण प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या जात आहेत.

शेती, विहिरी आणि पाण्याच्या उपलब्धतेची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेऊन शासनाची मदत योग्य लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हाभर पाहणी दौरे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून शक्य तितकी मदत मिळवून देण्यास प्राधान्य राहील. कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि साठवणुकीवर भर

कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन, साठवणूक आणि भूजल पुनर्भरण न झाल्यास उन्हाळ्यात तसेच पावसाच्या खंडाच्या काळात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे भविष्यात अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी पावसाचे पाणी अडवून त्याची साठवणूक करणे आणि भूजल पुनर्भरणाला चालना देणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

गावपातळीवर उपलब्ध पावसाचे पाणी अडविण्यासाठी लहान बंधारे, जलसंधारणाची कामे तसेच स्थानिक पातळीवरील अन्य उपाययोजना राबविण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यातील गरजांचा विचार करत आतापासूनच गावागावांत पाणी अडविणे, साठविणे आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्यासह जलसंधारण व लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

error: Content is protected !!